नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोरोनाबाधित किंवा कोरोना झाल्याबाबत सांशक असलेल्या रुग्णांची स्थानिक प्रशासनाकडे किंवा महापालिकेकडे तसेच संबंधित कोविड केअर सेंटरमध्ये नोंद करणे गरजेचे आहे. मात्र, या नोंदीबाबत नागरिकांकडून तसेच प्रशासनाकडून हेळसांड होताना दिसते. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
अनेक नागरिक हॉस्पिटलमधील बिलाच्या भीतीनेच रुग्णालयात न येणेच पसंत करतात. तसेच, काही हॉस्पिटलमध्ये जागाच उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. दुसरीकडे मात्र, महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरबाबत नागरिकांना विश्वास राहिलेला नाही. याची चर्चा होताना दिसते. त्यामुळे अनेक नागरिक बाधा झाल्यावर घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार करण्याचा पर्याय निवडतात. अशा परिस्थितीमध्ये होम आयसोलेशनचा पर्याय निवडल्यानंतर रुग्णांनी स्थानिक प्रशासनाकडे त्यासंदर्भात नोंद करणे आवश्यक असते. किंवा नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्ये नोंद केली असेल तर त्यांना अधिक त्रास झाल्यास हॉस्पिटलमध्ये तातडीच्या वेळी बेड मिळणे शक्य होते. मात्र, अनेक रुग्णांनी कोरोनाबाधित असल्याची नोंदच केलेली नाही. सौम्य लक्षणे असलेले नागरिक या उपचाराने बरे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर काही नागरिक नाव न नोंदवण्याचा पर्याय स्वीकारत आहे. उपचार पुरेसा ठरत असला तरी, नाव नोंदणी ही आवश्यक आहे. कोविड केअर सेंटर मध्ये देखील रुग्णांना सौम्य लक्षणे असतील तर, त्यांची तपासणी करून त्यांना होम आयसोलेशनचा मार्ग सुचवला जातो. त्याचबरोबर त्यांना पाच दिवसांची औषधे देऊन घरी पाठवण्यात येते. व नियमितपणे त्यांना फोन करून प्रकृतीची विचारणा देखील केली जाते. त्याचप्रकारे संबंधित रुग्णाची लक्षणे जर अधिक तीव्र झाल्यास त्याला त्वरित महापालिकेच्या रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली जाते.