नाशिक (प्रतिनिधी): राज्यात कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि आधी होती त्यापेक्षा जास्त बेरोजगारी वाढली. परंतु, आता सगळ्या बेरोजगारांसाठी खुशखबर आहे.राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या पुढाकाराने खाजगी क्षेत्रात तब्बल ७० हजार नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यासाठी १२ व १३ डिसेंबरला ऑनलाईन राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.आता पर्यंत राज्यभरातून ४५ हजार रिक्त पदांची नोंदणी करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यांमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच इतर कंपन्यांमधून देखील इतर प्रातांमधील कामगार काम सोडून गेल्याने त्यांना कामगारांची गरज आहे. सद्य परिस्थिती बघता लोकांना प्रत्यक्षात बोलवणे शक्य नाही म्हणून ऑनलाईन प्रक्रियेचा मार्ग अवलंबला आहे. या प्रक्रियेच्या सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. पण नंतर हळूहळू तो कमी झाला. नाशिकमधील या उपक्रमाची दखल कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी घेतली. हाच उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबवण्यात यावा असे त्यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात एकाच वेळी हा ऑनलाईन मेळावा आयोजित केला आहे.