महत्वाची बातमी: नवरात्रोत्सवानिमित्त नाशिक शहराच्या या भागांत वाहतूक मार्गात बदल
नाशिक (प्रतिनिधी): शहराचे ग्रामदैवत असलेल्या कालिकादेवी यात्रोत्सवानिमित्त नवरात्रोत्सव काळात महामार्ग बसस्थानक ते गडकरी सिग्नल या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात दुपारी १२ ते ३ या वेळेव्यतिरिक्त या मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
श्री कालिकादेवी यात्रोत्सवाला आज सोमवार (ता. २६)पासून प्रारंभ होत आहे.
नाशिकचे ग्रामदैवत असल्याने कालिकादेवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. यानिमित्त रस्त्याच्या दुतर्फा दुकाने, रहाट पाळणेही दाखल होतात.
त्यामुळे सकाळी-सायंकाळी दर्शनासाठी भाविकांची, तर सायंकाळी यात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी हजारो भाविक येतात. नवरात्रोत्सवाच्या १० दिवसांत मुंबई नाका ते गडकरी सिग्नलपर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल केला आहे.
- नाशिक: प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न
- नाशिक: लष्करी हद्दीत पुन्हा ड्रोन उडाला, गृह विभागाकडून गंभीर दखल
- Find Best Services in Nashik
संभाव्य वाहतूक कोंडी व गर्दी टाळण्यासाठी शहर पोलिस व वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत कालिका मंदिर परिसरातून होणाऱ्या सर्व प्रकाराच्या वाहतुकीला प्रवेशबंदी केली आहे. पहाटे पाच ते दुपारी १२ व दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत या वाहतूक मार्गात बदल केला आहे.
मोडक सिग्नल ते संदीप हॉटेल कॉर्नर, महापालिका आयुक्त निवासस्थानापासून ते भूजल सर्वेक्षण कार्यालय, चांडक सर्कल ते संदीप हॉटेल, महामार्ग बसस्थानक ते संदीप हॉटेलपर्यंत येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. ही वाहतूक मोडक चौक सिग्नल येथून खडकाळी सिग्नलमार्गे ६० फुटी रोडने द्वारका सर्कल मार्गाने नाशिक रोड व सिडकोकडे जाईल.
मुंबई नाक्याकडून शहरात येणारी हलकी वाहने महामार्ग बसस्थानक, तूपसाखरे लॉन्स, हुंदाई शोरूमसमोरून चांडक सर्कल, भवानी सर्कलमार्गे त्र्यंबक रोडने शहरात येतील, तर शहरातून सातपूर आणि अंबडकडे जाणारी वाहने द्वारका सर्कलमार्गे गरवारे-टी पॉईंटमार्गे सातपूर एमआयडीसीमध्ये जातील.
द्वारका सर्कलवरून पंचवटीत जाणारी जड वाहने कन्नमवार पूल, संतोष टी पॉईंट, रासबिहारी हायस्कूल मार्गाने पंचवटीत जातील. सारडा सर्कलकडून गडकरी चौकाकडे येणारी वाहने एन. डी. पटेल रोड, किटकॅट वाईन शॉप चौफुली मार्गाने मोडक सिग्नलमार्गे जातील.