मुंबई-आग्रा महामार्गावर पहाटे नाशिकच्या कुटुंबाला मारहाण करून लूट

मुंबई-आग्रा महामार्गावर पहाटे नाशिकच्या कुटुंबाला मारहाण करून लूट

नाशिक (प्रतिनिधी): तब्येत बिघडलेल्या आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर इंदूर येथून कारने नाशिककडे परतणाऱ्या कुटुंबाला मुंबई-आग्रा महामार्गावरील जामफळ धरण (ता. शिंदखेडा) परिसरात मारहाण करून लुटले.

हा थरार सोमवारी (ता. ४) पहाटे घडला.

दरोडेखोरांनी महिलांसह पुरुषांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने अक्षरशः ओरबाडले.

मारहाणीत काही जण जखमी झाले. पीडित कुटुंबाने सोनगीर पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

नाशिकच्या अशोकनगरमधील (सातपूर) बांधकाम व्यावसायिक कैलास जाधव (वय ४८) यांचे मोठे बंधू रमेश जाधव आईसमवेत इंदूरला राहतात. आईची तब्येत बिघडल्याने कैलास जाधव रविवारी (ता. ३) मुलगा कुणाल, बहिणी शोभाबाई ठाकरे (रा. कुसुंबा, ता. धुळे), लीलाबाई यशवंत गवळी (रा. विराणे, ता मालेगाव), मेहुणे यशवंत भिका गवळी, चालक मयूर चव्हाण (रा. नाशिक) यांच्या एर्टिगा कारने (एमएच ४८, पी २१८७) इंदूरला गेले होते. त्यांनी आईला इंदूरच्या रुग्णालयात दाखल केले. रविवारी रात्री दहाच्या सुमारास कैलास जाधव, मुलगा कुणाल, दोन्ही बहिणी व मेहुण्यांसमवेत पुन्हा नाशिकला येण्यासाठी निघाले.

इंदूरहून धुळ्याकडे येत असताना, सोमवारी पहाटे मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्यापासून दीड ते दोन किलोमीटर पुढे आल्यावर त्यांच्या कारपुढे दुभाजकाजवळ झाडाझुडपांमधून दोन संशयितांनी लाकडी ठोकळा फेकला. कार भरधाव असल्याने ती ठोकळ्यावर चढल्याने कारचा टायर फुटला. अचानक झालेल्या या घटनेमुळे कारमधील सारेच घाबरले. काही अंतरावर कार थांबवून कारला नेमके काय झाले, हे पाहण्यासाठी चालक मयूर चव्हाण कुणाल जाधवसह खाली उतरला असता अचानक सहा ते सात जण कारजवळ आले व त्यांनी लाठ्या-काठ्यांनी जाधव यांच्यासह त्यांच्या बहिणी, मेहुण्यांना मारण्यास सुरवात केली. दोन ते तीन संशयित जाधव यांच्या दोन्ही बहिणींच्या अंगावरील दागिने ओरबाडू लागले.

दोन्ही बहिणींनी अंगावरील दागिने काढून देत मारहाण न करण्याची विनंती केली. त्याच वेळी कुणाल जाधव व चालक मयूरही काही जण मारहाण करीत असल्याचे पाहून कारकडे पळाले. लुटारूंनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांनाही काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चालक मयूरला रस्त्याखाली फेकून दिले. घाबरलेल्या जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबाने तेथून पळ काढला. कुणाल जाधवने धुळे  पोलिस कंट्रोल रूमला भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. जाधव कुटुंबीय सोनगीर फाट्यावर येऊन थांबले. काही वेळाने पोलिसांचे वाहन आले. जाधव यांनी आपबीती पोलिसांना सांगितली. नंतर सारे जण सोनगीर पोलिस ठाण्यात आले. दरोडेखोरांनी चालक मयूरच्या डाव्या पायावर दगडाने मारहाण केली असून, त्यात तो गंभीर जखमी झाला. दरोडेखोर २५ ते २७ वयोगटातील होते. त्यांनी तोंडाला मास्क व रूमाल बांधले होते. अंगात टी-शर्ट व पँट होती.

ते हिंदीत बोलत होते, अशी माहिती जाधव यांनी पोलिसांना दिली. दरोडेखोरांनी शोभाबाई यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र, पाच ग्रॅमची कर्णफुले, लीलाबाई यांच्या गळ्यातील चार ग्रॅमचे मंगळसूत्र व तीन ग्रॅमची कर्णफुले, कैलास जाधव यांच्या खिशातील ४१ हजारांची रोकड, चालक मयूर चव्हाणच्या खिशातील १५ हजारांची रोकड, कुणाल जाधवच्या खिशातील दीड हजार रुपये, असा एकूण एक लाख ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत कैलास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटना घडलेली हद्द शिंदखेडा तालुक्यात येत असल्याने हा गुन्हा शिंदखेडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790