मका खरेदी प्रक्रिया २९ जानेवारी पर्यंत पूर्ण करावी – छगन भुजबळ

नाशिक/येवला (प्रतिनिधी): मका खरेदीसाठी शासनाने ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्या मुदतीच्या आत २९ जानेवारी पर्यंतच संपूर्ण मका खरेदी करण्यात यावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री छगन भुजबळ हे आज येवला दौऱ्यावर असतांना त्यांनी आज येवला संपर्क कार्यालयात कोरोना, मका खरेदीसह प्रलंबित विकासकामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, महावितरण विभागाच्या उपअभियंता पिनल दुसाने,उमेश चौधरी,गटविकास अधिकारी डॉ उन्मेष देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मका खरेदीसाठी शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत मका खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी रात्रंदिवस खरेदी सुरू ठेऊन २९ तारखेपर्यंत मका खरेदी पूर्ण करण्यात यावी असे आदेश देत कोणत्याही शेतकऱ्यांची मका शिल्लक राहू नये अशा सूचना केल्या. येवला शहरात असलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी तसेच येवला शहरातील विंचूर चौफुलीसह इतर वाहतूक बेटांची स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात यावे. तसेच शहर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.

ते म्हणाले की, येवला शहरातील विस्तापित झालेल्या गाळे धारकांना नवीन इमारतीत ५० टक्के आरक्षण ठेऊन त्यांना प्राधान्याने गाळे देण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा. तसेच येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून येत्या १५ दिवसाच्या आत उदघाटन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे असे सांगत कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा त्यांनी यावेळी दिला

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790