भूमाफिया रम्मी राजपूतच्या नावाने उद्योजकाकडे मागितली खंडणी
नाशिक (प्रतिनिधी): भूमाफिया रम्मी राजपूतच्या नावाने एका उद्योजकाकडे तब्बल २ कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी संशयित रुपेश धीरवाणी, मोहनलाल पहुजा या दोघांच्या विरोधात सातपूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकाराने रम्मी राजपूत हा कारागृहातून टोळी चालवत असल्याची चर्चा सुरू आहे.
भूमाफिया रम्मी राजपूत आनंदवली मंडलिक खून प्रकरणात मोक्काखाली मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र रम्मीच्या दहशत शहरात अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती आणि ईश्वर लापसीया (रा. सावरकरनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत सातपूर एमआयडीसीतील प्लाॅट नंबर ६८/४ या इंडस्ट्रीज प्लाॅटवरील अतिक्रमण काढण्यासाठी संशयित धीरवाणी, पहुजा यांनी लापसीया यांच्या मोबाइलवर फोन करून मांडवली करण्यासाठी दोन कोटींची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर कुख्यात गुन्हेगार रम्मी राजपूतकडे हे प्रकरण गेले तर महागात पडेल, अशी धमकी देत लापसीया आणि प्लाॅटचे मालक सुरेश शहा यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार पोलिसांत दिली. सातपूर पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सतीश घोटेकर तपास करीत आहे.