भाव नसल्याने बळीराजावर आली वाईट वेळ; संतापाने शेतातच सुरू केला कोबी फळी खेळ !
विष्णू थोरे, चांदवड
जगाचा पोशिंदा म्हणून जो शेतकरी काबाड कष्ट करून शेत पिकवतो त्याच्या घामाला एकीकडे कवडीमोल किंमत मिळत आहे तर दुसरीकडे मटणाच्या आणि दारूच्या दुकानात मात्र रांगा लागत आहे हे फार विदारक चित्र महाराष्ट्रात सद्या बघायला मिळते आहे. कोरोनाच्या काळात विस्कटलेली घडी सावरता सावरता त्याची झोळीच फाटण्याची वेळ आली आहे.
टोमॅटो,सिमला मिरची पाठोपाठ आता कोबी या पिकालाही बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेसह संताप व्यक्त होताना दिसत आहे. चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथील शेतकरी समाधान वाल्मिक खुटे यांनी एक एकर कोबी पीक लावले होते,त्यासाठी त्यांनी एकरी तब्बल 50 हजार रुपये लागवडी साठी खर्च केला . हातातोंडाशी आलेले पीक बाजारात नेले असता ते दोन रुपये प्रति किलोने विकले गेले. समाधान खुटे यांचा माल बाजारात नेण्याचाही खर्च त्यातून फिटत नसल्याने त्यांनी शेतातच चेंडू फळी सारखा कोबी फळी हा नवा खेळ संतापून सुरू केला. ते कोबी पिकावर उद्या रोटरी मारणार आहेत. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांची अशी बिकट अवस्था असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.