Job in Nashik: Require Business Development Executive. (BBA/MBA)Click Here
बनावट ओळखपत्र दाखवून एचएएलच्या प्रतिबंधित क्षेत्रात घुसले दोन तोतया अधिकारी; एकास अटक
नाशिक (प्रतिनिधी): बनावट ओळखपत्र दाखवून अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
संरक्षण खात्याचा कणा असलेल्या ओझर येथील एचएएलच्या प्रतिबंधित क्षेत्रात बनावट ओळखपत्र बाळगून कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवत फिरणाऱ्या नाशिक येथील एकासह पालघरच्या विक्रमगड येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एका संशयिताला ओझर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बनावट ओळखपत्रे बनवून देणारा मुख्य आरोपी पडद्याआड असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे.
मनोज पटेल ऊर्फ अबू हसन सलीम पठाण (वय ३७, रा. सारडा सर्कल, नाशिक) व हर्षल रमेश भानुशाली (रा. विक्रमगड, जि. पालघर) यांच्याविरुद्ध सुरक्षा अधिकारी बबनराव मारुती पोटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपअधीक्षक अर्जुन भोसले, निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव, किशोर अहिरराव, विश्वनाथ धारबळे, दीपक गुंजाळ, जितेंद्र बागुल तसेच ओझर पोलिस स्थानकामार्फत दोघा संशयितांविरुद्ध ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्पच्या लष्करी हद्दीतील संवेदनशील परिसरात काही महिन्यांपूर्वीच इतर दोन तोतया मेजरना अटक करण्यात आली होती. यातील एक चांदवड तालुक्यातील तर एक देवळाली कॅम्प येथील होता. लष्कराचे बनावट लोगो त्यांच्या वाहनांवर होते. तसेच गणवेशही तसाच परिधान करून बनावट ओळखपत्रासह ते वावरत होते. भरतीच्या नावाखाली काही तरुणांची त्यांनी फसवणूकही केली होती.