बजाज फायनान्सच्या नावाने नाशिकच्या व्यक्तीची लाखोंची फसवणूक; आरोपींना बिहारमधून अटक
नाशिक (प्रतिनिधी): बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगत पर्सनल लोन मंजूर झाल्याच्या मोबदल्यात प्रोसेसिंग फी व इतर फीच्या नावाखाली तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा संशयितांना उपनगर पोलिसांनी बिहारमधून अटक केली. पोलिसांनी संशयितांकडून आठ मोबाईल व सिम कार्डदेखील जप्त केले.
उपनगर येथील मिलिंद खरात यांनी ९ जून २०१९ ला ऑनलाइनच्या माध्यमातून पर्सनल लोनसाठी अर्ज केला होता. विकास जैन, अंशुमन साहू, पंकजसिंह बजोरिया आणि संजीव कुमार यांनी खरात यांच्याशी संपर्क साधत बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. पर्सनल लोन मंजूर झाल्याचे सांगत प्रोसेसिंग फी व इतर फीच्या नावाखाली त्यांच्याकडून एक लाख ९ हजार ९०५ रुपये हे उकळले.
फसवणूक झाली असल्याचे खरात यांना समजताच त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. उपनगर पोलिसांनी फोन व त्यांनी केलेले फोन पे च्या माध्यमातून संशयितांची लिंक शोधली. यानंतर सहाय्यक निरीक्षक आजिनाथ बटुळे, अनिल लोहरे, मुकेश क्षीरसागर, अनिल शिंदे यांनी थेट बिहार गाठत संशयित मिथिलेश कुमार, जितेंद्रकुमार अवधेश प्रसाद या दोघांना अटक करत नाशिक येथे आणले.