नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक पोलीस कर्मचारी दिवसरात्र कार्यरत असतात. नागरिकांचं रक्षण करत असतांना अनेकांना कोरोनामुळे आपला जीवसुद्धा गमवावा लागलाय. आज (दि.०७) नूतन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की पोलीस आयुक्तालयातील शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच मनातली कोरोनाची भीती घालवण्याची आणि कोरोनाला लढा देण्यासाठी त्यांना मानसिक तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम करणे हाच माझा नाशिकमाध्ये नियुक्त झाल्यानंतरचा पहिला अजेंडा आहे.
दीपक पाण्डेय यांनी शुक्रवारी (दि.०४) सकाळी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. गेल्या तीन दिवसात त्यांनी शहरातल्या अनेक पोलीस ठाण्यांना भेट दिली. तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मनात असलेल्या कोरोनाविषयीचे गैरसमज दूर करण्यावर भर दिला. त्यानंतर आज पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले “पोलिसांचे धैर्य वाढवण्यासाठी ‘स्वतंत्र कोविड सेंटर’ लवकरच सुरु केले जाईल.”