🛑 पुन्हा एकदा जळीतकांड: जळालेल्या कारमध्ये आढळला मृतदेह, सुवर्णा वाजे प्रकरणाची पुनरावृत्ती ?

पुन्हा एकदा जळीतकांड: जळालेल्या कारमध्ये आढळला मृतदेह, सुवर्णा वाजे प्रकरणाची पुनरावृत्ती ?

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील पर्यटन नगरी असलेल्या इगतपुरीत जळालेल्या अवस्थेत एक कार आणि त्यामध्ये मृतदेह आढळून आला आहे.

सुप्रसिद्ध भावली धरणाच्या पुढच्या बाजूला आंबेवाडी परिसरात ही कार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नुकत्याच झालेल्या शनिवार-रविवार या वीकेंडला ही घटना घडलेली असू शकते.

हाच रस्ता भंडारदराकडे सुद्धा जातो. नाशिक मुंबई पुणे विविध भागातून पर्यटक इथे पर्यटनासाठी येत असतात.

त्यामुळे हा अपघात की घातपात या चर्चेला उधाण आला आहे. पुन्हा एकदा सुवर्णा वाजे प्रकरणाची पुनरावृत्ती तर झाली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जातेय.

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीव-हे परिसरातील मिलीटरीच्या हद्दीत काही महिन्यांपूर्वी एका डॉक्टर महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा इगतपुरीतील आंबेवाडी येथे एका कारमध्ये जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे…

याबाबत अधिक माहिती अशी की, कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा यासंदर्भात अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. या अज्ञात मृतदेहाचा खून करून कारला आग लावल्याने ही कार पुर्णपणे जळुन खाक झाली आहे. तसेच कारच्या दोन्ही बाजुकडील नंबर प्लेटाही जळुन गेल्या आहेत.

दरम्यान, घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group