पर्यावरणपुरक पध्दतीने गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे प्रशासनाचे आवाहन
नाशिक (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या काळात जलप्रदुषण रोखण्याच्या दृष्टीने पर्यावरणपुरक पध्दतीने गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी गंगापुर, गौतमी, गोदावरी, काश्यपी, दारणा, भावली, वालदेवी, मुकणे, कडवा, आळंदी भेजपुर व नांदूर मध्यमेश्वर बंधारा इत्यादी धरणस्थळी गणेशमुर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे व नाशिक ग्रामीण पोलीस उप अधीक्षक अर्जुन भोसले यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिध्दीपत्रकात नमुद केल्यानुसार, गणपती विसर्जनादरम्यान मुर्तीं व निर्माल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण निर्माण होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न, व जलप्रदूषण, वायुप्रदूषण व ध्वनीप्रदूषणाबाबतच्या तक्रारी या भागातील ग्रामपंचयातींनी संबंधित विभागाकडे केल्या आहेत. त्याबरोबरच धरणातील जलाशयाचे पाणी खोल असल्याने व पाण्याचा अंदाज येत नसल्याने विसर्जनादरम्यान अपघात होण्याचा धोकाही निर्माण होत असतो. त्यामुळे नागरीकांनी खबरदारी घ्यावी, असेही जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे व नाशिक ग्रामीण पोलीस उप अधिक्षक भोसले यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
कोरोना काळात जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये पर्यटन व धरण क्षेत्र स्थळी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (3) लागू असल्याने कोणीही विसर्जनासाठी धरणस्थळी येऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सुचनाही शहरातील नागरिकांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे व नाशिक ग्रामीण पोलीस उप अधीक्षक भोसले यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकांन्वये दिल्या आहेत.