नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी व्यावसायिक तसेच नोकरदार वर्गासाठी महत्वाची असलेली रेल्वे अर्थातच पंचवटी एक्स्प्रेस १२ सप्टेंबरपासून पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र पंचवटी एक्स्प्रेसमध्ये केवळ रिझर्व्हेशन करणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे पासधारकांची गैरसोय होत असल्याने पासधारकांनासुद्धा प्रवास करता येईल का? असा प्रश्न सगळेच विचारताहेत.
या पार्श्वभूमीवर रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजू फोकने यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागाचे डीआरएम विवेक गुप्ता यांच्या नावाने नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधक आर.के.कुठार यांना निवेदन देण्यात आले आहे. पासधारकांनासुद्धा पंचवटी एक्सप्रेस मध्ये प्रवास करू द्या, तिकिट आरक्षणामध्ये सुविधा द्या, २२मार्च पूर्वी किंवा नंतर काढलेल्या पासची वैधता तपासून त्याला मुदतवाढ द्यावी अशा मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.