नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील मयत पोलीसाच्या पत्नीच्या मुलांना देवळाली कॅम्प येथे सैन्यदलात नोकरी मिळवून देण्याचे आमिष देण्यात आले. तसेच वेळोवेळी त्यांच्या कडून पैसे घेऊन संशयिताने साडेसहा लाखाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हिरावाडी परिसरातील त्रिकोणी बंगल्याजवळ सत्यम पार्क येथे राहणाऱ्या मयत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीस संशयित राजू शंकर अहिरे (रा.पंचवटी मूळगाव देवळा) याने नोकरीचे आमिष दिले. दरम्यान, संशयिताने वेळोवेळी महिलेचा विश्वास संपादन करून, रोख व धनादेश स्वरूपात साडेसहा लाख रुपये उकळले. तसेच सैन्य दलात नोकरीची खोटी ऑर्डर फिर्यादीच्या घराच्या पत्त्यावर पाठवली. तर ऑर्डरमध्ये मुलांची नावे चुकली असून, पाठवलेले पाकीट फोडू नका असे सांगून संशयिताने खोटे आश्वासन देऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.