नाशिक: Product Adचे आमिष दाखवून महिलेची 5 लाखांची फसवणूक
नाशिक (प्रतिनिधी): हर्बल प्रोडक्टचे उत्पादन करणाऱ्या महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करण्याचे व प्रोडक्ट विकण्यास मदत करण्याच्या बहाण्याने ऑनलाईन भामट्यांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करीत तब्बल पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता अविनाश पवार (रा. शांतीनगर, जुने सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा घरगुती स्वरुपाचा हर्बल प्रोडक्ट बनविण्याचा व्यवसाय आहे.
या हर्बल प्रोडक्टच्या विक्रीसाठी सोशल मीडियावरून जाहिरात करण्याकरीता त्यांनी फेसबुकवर याबाबत माहिती टाकली होती.
त्यासाठी त्यांनी त्यांचा संपर्क क्रमांक दिला होता. त्या क्रमांकावर गेल्या मार्च २०२२ मध्ये अज्ञात संशयिताने व्यापारवृद्धीसाठी असलेल्या इंफो इंडिया प्रा. लि. मधून संपर्क साधत असल्याचे सांगून त्यांचे हर्बल प्रोडक्ट अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जाहिरात करून त्याची विक्री करून देण्याचे आमिष दाखविले.
त्यासाठी संशयिताने सविता पवार यांचा विश्वास संपादन केल्यानंतर काही रक्कम ऑनलाईन टाकण्यास भाग पाडले. त्यानुसार, त्यांनी सुरुवातीला ऑनलाईन पैसे भरले. त्यानंतर संशयिताने पुन्हा हर्बल प्रोडक्टच्या विक्रीसाठी ऑनलाईन वेबसाईट सुरू करण्याचे आमिष दाखवून त्यासाठी पुन्हा पैशांची मागणी केली.
अशाप्रकारे, यानंतर वारंवार वेगवेगळ्या संशयितांनी सविता पवार यांना संपर्क करून प्रोडक्ट विक्रीसाठीचे मोठमोठे आमिष दाखवून त्यांच्याकडून आतापर्यंत ५ लाख १३ हजार रुपये ऑनलाईन घेतले. यानंतरही त्यांच्या हर्बल प्रोडक्ट संदर्भात कोणतीही जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून होत नसल्याने लक्षात आले आणि आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नाशिक सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली हे तपास करीत आहेत.
दरम्यान, सत्यता न पडताळता सोशल मीडियावरून करण्यात येणाऱ्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन नाशिक सायबर पोलिसांनी केले आहे.