नाशिक (प्रतिनिधी): शहरात प्रतिबंधित गुटख्याची चोरीछुप्या रितीने विक्री होते. याबाबत पोलीस आयुक्तांनी थेट कारवाई करीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असल्याने पोलीसांची प्रतिबंधित गुटख्याची विक्री वा वाहतूक करणार्यांवर करडी नजर असतानाही वडाळागावातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करताना एकाला पोलिसांनी अटक केली.
त्यानंतर पोलिसांनी वडाळागावातून दोघांना अटक करीत त्यांच्या घरातून सुमारे ४ लाख ४३ हजारांचा गुटखा जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालय हद्दीत प्रतिबंधित गुटखा व अंमली पदार्थांची विक्री करणार्यांवर थेट गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांना वडाळागावातून एक संशयित प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करीत असल्याची खबर मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व त्यांच्या पथकाने ॲक्टिवा मोपेडवरून (एमएच १५ एचपी ३०४०) प्रतिबंधित विमल पानमसाला, आरएमडी मसाला, एम सेन्टेड तंबाखू गोल्ड असा प्रतिबंधित गुटखा घेऊन जात असताना संशयित मोहम्मद साजीद मोहम्मद नासीर अन्सारी याच्याकडून ४९ हजार १५६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
संशयित अन्सारीकडे सदरील मालाची चौकशी केली असता त्याने वडाळागावातून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संशयित मोहम्मद दिलशाद इस्लाममुद्दीन मलिक, मोहम्मद जुबेर रियासअली अन्सारी (दोघे रा. वडाळागाव) यांना ताब्यात घेत त्यांच्या घरातून ४ लाख ४३ हजार ४२९ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
पोलिसांनी या गुन्ह्यात मोपेडसह प्रतिबंधित गुटखा असा ४ लाख ९२ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाकय निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, येवाली महाले, सुरेश माळोदे, योगीराज गायकवाड, रामदास भडांगे, संदीप भांड, धनंजय शिंदे, मोतीराम चव्हाण, महेश साळुंके, मुक्तार शेख, राहुल पालखेडे, गौरव खांडरे, अण्णसाहेब गुंजाळ यांनी बजावली.