नाशिक: ‘सॉरी मला माफ करा’ अशी चिठ्ठी सोडून चोराकडून चोरीचा मुद्देमाल परत!
नाशिक (प्रतिनिधी): देशात रोज चोरीच्या लाखो घटना घडत असतात.
कोणाची गाडी, कोणाचे सोने तर कोणाचे पैसे चोरी होत असतात.
एकदा चोरीला गेलेला ऐवज परत मिळण्याची कधीच शक्यता नसते.
परंतु, एखाद्या चोरानेच चोरी केलेला तुमचा ऐवज परत आणून दिला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल ना. अशीच एक घटना समोर आली आहे. चोराने चोरी केलेले तब्बल तीन तोळे सोन्याचे दागिने परत केले आहेत. एवढेच नाही तर दागिने परत करताना या चोराने चिठ्ठी लिहून चक्क माफीसुद्धा मागितली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शरद साळवे (रा. विठ्ठलनगर जलकुंभाजवळ, जेलरोड) यांनी शनिवारी (दि. ८) घरफोडी झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी जात पंचनामा सुरू केला. याचवेळी दुसऱ्या पोलिस पथकाने या घराच्या आसपास तपास सुरू केला.
घरफोडी कशी झाली असेल तसेच चोराने घरात कसा प्रवेश केला असेल याचा शोध घेत असताना पोलिसांना घराच्या छतावर एक बॅग आढळली. यात सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र असा चोरी गेलेला ईवज होता. सोबतच एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘तुमच्या गल्लीतलाच एक माणूस, मला माफ करा, मी तुमची बॅग घेतली आणि पत्र्यावर टाकली. मला पैशांची गरज होती पण मी ते घेतले नाही, सॉरी मला माफ करा’ असा मजकूर लिहिलेला होता.
चोराने दागिने परत करण्याची ही अशी पहिलीच घटना घडली आहे. चोरी झाल्यानंतर चोराने दागिने परत करत माफी मागण्याची ही पहिलीच घटना आहे. पकडले जाण्याची भीतीने का होईना चोराने दागिने परत केल्याने पोलिसांचा तपासाचा ताण कमी झाला. साळवे यांच्या घरातून बॅग चोरी झाली होती. साळवे यांच्या परिचयातील इसमाने ही चोरी केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Offer: Buy Garbage Bags, Medium – 30 bags/roll (Pack of 6)