नाशिक: सैन्य दलात नोकरीस लावून देण्याचे आमिष; तोतया लष्करी जवानाकडून ११ लाखांची फसवणूक

नाशिक: सैन्य दलात नोकरीस लावून देण्याचे आमिष; तोतया लष्करी जवानाकडून ११ लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): लष्करी जवान असल्याचे भासून भारतीय सैन्य दलात नोकरीस लावून देतो अशी खोटी बतावणी करून तरुणांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे…

दोन युवकांना लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुमारे ११ लाख रुपयांना गंडा घालणार्‍या चार तोतया लष्करी जवानांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई लष्करी गुप्‍तवार्ता विभाग व लासलगाव पोलिसांच्या पथकाने केली.

बापू छबू आव्हाड (रा. आंबेगाव, ता. येवला, जि. नाशिक), सत्यजित भरत कांबळे (रा. आनंदवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), राहुल सुमंत गुरव (रा. देवी बाभुळगाव, ता. जि. बीड आणि विशाल सुरेश बाबर (रा. डेळेवाडी, ता. कर्‍हाड, जि. सातारा) अशी गंडा घालणार्‍या तोतया लष्करी जवानांची नावे आहेत.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की फिर्यादी गणेश सुकदेव नागरे (वय २०, रा. पाचोरे बुद्रुक, ता. निफाड, जि. नाशिक) व त्यांचा मित्र आकाश रामनाथ यादव (रा. शिरवाडे, ता. निफाड, जि. नाशिक) हे तरुण नोकरीच्या शोधात होते. या तरुणांची लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती.

त्यादरम्यान दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी आरोपी बापू आव्हाड, सत्यजित कांबळे, सुमंत गुरव व विशाल बाबर यांनी या दोघा मित्रांशी संपर्क साधला. त्यावेळी या चारही आरोपींनी भारतीय सैन्यदलातील सैनिकांचा गणवेश घालून व खोटे ओळखपत्र दाखवून सैन्यदलातील सरकारी लोकसेवक असल्याचे भासविले, तसेच या चारही आरोपींनी नागरे व यादव यांच्याशी संपर्क साधून विश्‍वास संपादन केला. आरोपींच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून या दोन्ही तरुणांनी लष्करात भरती होण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्‍त केली.

आरोपींनी या तरुणांना “तुम्हाला लष्करात नोकरी लावून देतो,” असे आमिष दाखविले. त्यानंतर चारही आरोपींनी संगनमत करून गणेश नागरे व आकाश यादव या दोन्ही मित्रांकडून अनुक्रमे ५ लाख ४५ हजार, ५ लाख ७५ हजार, अशी एकूण ११ लाख २० हजार रुपयांची रक्‍कम उकळली; मात्र २७ डिसेंबर २०२१ पासून ते ३१ मे २०२२ यादरम्यान पैसे देऊनही लष्करात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होत नसल्याने व नोकरीची हमी मिळत नसल्याने हे दोघे तरुण हवालदिल झाले. त्यांनी आरोपींकडे नोकरीबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली व दिलेले पैसे परत देण्यासही टाळाटाळ केली.

यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गणेश नागरे या तरुणाने लासलगाव पोलीस ठाणे गाठून आरोपी बापू आव्हाड, सत्यजित कांबळे, राहुल गुरव व विशाल बाबर या तोतया लष्करी जवानांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद काल दिली असून, या आरोपींविरुद्ध भा. दं. वि. कलम ४२०, १७१, १७०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजीनाथ कोठाळे करीत आहेत.

दरम्यान, या चारही आरोपींनी लासलगावसह इतर ठिकाणीही बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या आरोपींपैकी बापू आव्हाड नामक तोतया लष्करी सैनिकाने तर १५ ऑगस्ट २०२२ रोजी गावातील शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून ध्वजवंदनही केले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790