नाशिक: सेवानिवृत्त महिला सहकाऱ्याकडून लाच घेतांना PWD च्या दोघांना ACB कडून अटक !

नाशिक (प्रतिनिधी): रजेच्या फरकाचे बिल व इतर बिलांचे काम करुन देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.२३) अटक केली. विशेष म्हणजे स्वतःच्याच विभागातील निवृत्त सहकाऱ्याकडे या दोघांनी लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्तर विभाग कार्यालय, नाशिक येथील मुख्य लिपीक प्रवीण नामदेव पिंगळे आणि वरिष्ठ लिपीक लता शांताराम लहाने अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार कर्मचारी हे ३० जुलै २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे सेवा पुस्तक पडताळणी, रजेच्या फरकाचे बिल व इतर बिलांचे काम प्रलंबित होते. हे काम करुन देण्यासाठी दोघा लाचखोरांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि गुरुवारी (दि.२३) बांधकाम विभागाच्या कार्यालयात १० हजार रुपयांची लाच स्विकारताना दोघांना अटक केली.
ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झालो, तिथेच कामासाठी लाच मागण्यात आल्याने तक्रारदार महिलेला धक्काच बसला. त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. या तक्रारीची पडताळणी करुन आज (दि. २३) सार्वजनिक बांधकाम विभागच्या आस्थापना विभागात सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम स्वीकारताना पिंगळे व श्रीमती लहाने (बोडके) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.