नाशिक: सिडकोत सराईत गुन्हेगाराचा खून; दोघांना अटक
नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये एका सराईतावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
तसेच खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचत अटक केली…
याबाबत सविस्तर माहिती अशी की २८ आक्टोबरच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संशयित तन्मय मनोज गोसावी व आकाश अनिल साळुंखे हे दोघे जण महालक्ष्मी नगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर बसलेले असताना अक्षय उत्तम जाधव हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला.
यावेळी त्यांचे वाद झाले असता संशयित तन्मय गोसावी याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षय जाधव याच्या डोक्यावर वार केला.
त्यावेळी अक्षय समोर असलेल्या घराच्या एका बाल्कनीत पळाला. तर गोसावी व साळुंखे हे त्याच्या मागे पळाले व पुन्हा एकदा अक्षयच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याच्या डोक्यात दगड मारला तसेच या ठिकाणी असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने अक्षयला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित हे त्याला मारतील या भीतीने तो पळून गेला. त्यानंतर त्याने अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. अंबड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले व जखमी अक्षय जाधव यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून पोलीस गाडीत बसवून जिल्हा रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी अक्षयला तपासून मृत घोषित केले.
दरम्यान पसार होण्याच्या तयारीत असताना अंबड पोलिसांनी अक्षय जाधव याचे मारेकरी संशयित तन्मय गोसावी व आकाश साळुंखे या दोघांना अटक केली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे उपयुक्त विजय खरात व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अक्षय सराईत गुन्हेगार:
अंबड पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या अक्षय जाधव हा वीस दिवसांपूर्वीच नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. गेल्या वर्षी त्यास शहर जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आलेले होते. खून, प्राणघातक हल्ले, घरफोड्या, हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते.