नाशिक: चार चौघात बायकोच्या पाया पडायला लावून सासूने अपमान केल्याने जावयाची आत्महत्या

नाशिक: चार चौघात बायकोच्या पाया पडायला लावून सासूने अपमान केल्याने जावयाची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): सासूने आप्तेष्ट व ओळखीच्या लोकांसमोर पोलीस चौकी परिसरात पत्नीच्या पाया पडण्याचा तगादा लावल्याने अपमानित झालेल्या जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

याप्रकरणी उपनगर पोलिसांत सासू व पत्नीच्या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोहनपाल चटोले यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नितीन सोहनपाल चटोले (वय: ३०) आपली पत्नी व मुलांसोबत देवळाली गाव वडारवाडी येथे राहतो.

हे ही वाचा:  SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; इथे पहा निकाल…

तर नितीनचे आई-वडील जय भवानी रोड येथे राहतात. दहा वर्षांपूर्वी कारगिल गेट, वडनेर येथील विमल सुभाष बिडलान यांची मुलगी नेहा हिच्याशी नितीनचे लग्न झाले होते.

नेहाची आई विमल सुभाष बिडलान, भाऊ विकी सुभाष बिडलान व राहुल सुभाष बिडलान यांनी नेहा व नितीनच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करून, तुम्ही स्वतंत्र रहा, असा आग्रह धरल्यामुळे नेहा व नितीन हे वडारवाडी येथे वेगळे राहू लागले.

हे ही वाचा:  नाशिक: 'या' सराफ व्यावसायिकाकडे 26 कोटी रुपये रोख अन् 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त!

पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने दीड-दोन वर्षांपूर्वी नेहा ही माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून नितीन नैराश्यात होता. गेल्या गुरुवारी नितीन व नेहामध्ये सासू विमालच्या संसारातील हस्तक्षेपावरून भांडण झाले. संतापाच्या भरात नितीनने पत्नी नेहाला चापट मारली होती. त्यावरून उपनगर पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शुक्रवारी सायंकाळी देवळाली गावामधील सुंदरनगर पोलीस चौकीत सासूने जावयाला सर्वांसमोर नेहाच्या पाया पडायला भाग पाडले होते. सर्वांसमोर झालेला अपमान व मेहुण्यांच्या सततच्या छळाला कंटाळून नितीनने घरी जाऊन छताच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे ही वाचा:  नाशिक: हायवा डंपर चोरणाऱ्या आरोपीस मध्यप्रदेशातून अटक

नितीनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू विमल, मेहुणे विकी आणि राहुल यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ००२७/२०२३). वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group