नाशिक: युवकाच्या मारहाणीत चार वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक: युवकाच्या मारहाणीत चार वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात एका युवकाने मारहाण केल्याने 4 वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिसांनी तपासला गती देत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

गणेश उर्फ अमोल नाना माळी (20) रा. बोकडदरा ता. निफाड हा युवक एका विवाहितेस तिच्या दोन मुलांसह महिन्यापूर्वी पळवून घेऊन गेला होता. हे दोघे गेल्या पंधरा दिवसापासून गुळवंच शिवारात एका शेतकऱ्याकडे काम करत होते. या दोघांकडे कृष्णा नावाचे चार वर्षाचे बालक होते. गुरुवारी (दि. 6) सायंकाळी कामावरून परत आल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाले.

कृष्णा याने उलटा शर्ट घातल्याची कुरापत काढून गणेशने रागाच्या भरात बालकाला काठीने मारहाण करीत ढकलून दिले. यात कृष्णा याच्या डोक्याला मार लागला. थोड्यावेळाने त्यांनी कृष्णा यास चहा पाजला. मात्र, त्यास त्रास होऊ लागल्याने दोघांनी त्याला दुचाकीहून खासगी बाल रुग्णालयात दाखल केले.

नाशिक: एसटी बसला भीषण अपघात, महिला कंडक्टरसह 1 महिला ठार, 5 प्रवासी गंभीर जखमी

तेथून अधिक उपचारासाठी बालकास सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी बालकाला तपासून मृत घोषित केले. मात्र, त्यावेळी संशयित गणेश माळी याने घटनास्थळावरून पळ काढला. डॉक्टरांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.

नाशिक: इगतपुरीजवळ खाजगी बसच्या अपघातात एकाचा मृत्यु; 12 प्रवासी जखमी

बालकाची आई काजल माळी हिने घडलेली घटना पोलिसांना सांगितल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव निकम यांनी संशयित आरोपीस पकडण्यासाठी बोकडदरा हद्दीतील निफाड पोलीस, बोकडदराचे पोलीस पाटील व सरपंच यांच्यासोबत संपर्क साधला.

त्यांनतर निफाड पोलिसांनी संशयित आरोपीच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस निरीक्षक शामराव निकम, सहाय्यक निरीक्षक संदेश पवार, हवालदार बापू महाजन, धनाजी जाधव, संजय बागुल, विनोद जाधव, काकड यांच्या पथकाने तात्काळ बोकडदरा येथे धाव घेतली. मात्र, संशयित आरोपी मिळून आला नाही.

त्यानंतर आरोपीच्या आत्याने आरोपीच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर पोलिसांना आरोपीचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी तातडीने दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे आत्याच्या घरी धाव घेऊन संशयित आरोपी गणेश माळी याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयीताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत संशयिताला बेड्या ठोकल्या आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790