नाशिक: मोबाईल दुकानात चोरी करणारे संशयित अटकेत; ६५ हजार रुपयांचे मोबाईल जप्त
नाशिक (प्रतिनिधी): संजीवनगर येथे एका मोबाईलच्या दुकानातून चोरी करून ३१ मोबाईल लंपास करणाऱ्या संशयितास अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मुद्देमालासह अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, (दि.३० ते३१ जुलै) पृथ्वीराज इंद्रदेव निषाद (३६, रा. घर नंबर २८१, गणपती गल्ली, खालचे चुंचाळे, अंबड, नाशिक) यांच्या पत्र्याच्या शेडच्या मोबाईल रिपेरिंगच्या दुकानाच्या शटरचे लॉक उचकून रिपेरिंग करता आलेले वेगवेगळ्या कंपनीचे ३१ मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस शिपाई हेमंत आहेर व जनार्दन ढाकणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक प्रशासन नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्ह्यात सहभागी असलेल्या यासीर अहमद रजा खान (१८, रा. बीके पेंटर बिल्डिंग, रॉयल बेकरी समोर, संजीव नगर, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक) व एका विधीसंघर्षित बालकाला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडून विविध कंपन्यांचे ६५ हजार रुपये किमतीचे मोबाईल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सपोनी गणेश शिंदे, पोलीस अंमलदार योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे, किरण सोनवणे, प्रशांत नागरे, संदीप भुरे, हेमंत आहेर, जनार्दन ढाकणे, राकेश राऊत, प्रवीण राठोड, मोतीराम वाघ, नितीन सानप,वाकचौरे यांनी यशस्वीरित्या केली. या प्रकरणी पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शांताराम शेळके करीत आहेत.