नाशिक: भरधाव बैलगाडा घाट सोडून गर्दीत घुसला, छातीवरुन चाक गेल्याने वृद्धाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेली बैलगाडा शर्यत पाहणे एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. त्या व्यक्तीला थेट आपला जीवच गमवावा लागला आहे.शर्यतीदरम्यान बैलगाडा अंगावरून गेल्याने ६४ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले होते.

उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या म्हसरूळ परिसरात घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत श्रावण जगन्नाथ सोनवणे( रा. चाणक्यपुरी सोसायटी, मखमलाबाद-म्हसरूळ लिंक रस्ता) यांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! दोघा सख्ख्या भावांची टोळक्याकडून हत्या

गेल्या आठवड्यात ६ जून रोजी नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील बोरगड येथे असलेल्या ठक्कर मैदानात बैलगाडा शर्यतीचे भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्यावतीने आणि म्हसरूळ ग्रामस्थ तसेच सोमनाथ वडजे यांच्या पुढाकारातून आयोजन करण्यात आले होते.

ही बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आलेल्या एका वृद्धाच्या अंगावरून बैलगाडा गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. बैलगाडा शर्यतीतील बैल उधळल्याने सोनवणे यांच्या अंगावरून बैलगाडी गेली होती. त्यात त्यांच्या छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच सोनवणे यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:  कसारा घाटात सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळला; दोन जण जागीच ठार

याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, शर्यतीवेळी अनेक जण जखमी झाले होते यातील पाच जणांवर मविप्रच्या आडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील दोघांना उपचारानंतर सोडून देण्यात आले. उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर आहे. अन्य तीन जखमींना मनपाच्या रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: 'या' दिवशी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

शहरात बराच वर्षांच्या कालावधीनंतर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मैदान प्रेक्षक व बैलगाड्यांनी भरून गेले होते. चार ते पाच बैलगाड्या एकाच वेळी धावू शकतील, अशी शर्यत मार्गाची व्यवस्था होती. पण हा मार्ग बंदिस्त नसल्याने धावत्या बैलगाड्या ह्या शर्यतीच्या मैदानातून बाहेर उधळत असल्याने नागरिकांच्या गर्दीतून जात होत्या. त्यामुळे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेले काही प्रेक्षक जखमी झाले होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790