नाशिक: बर्निंग कारचा थरार, चालत्या ओमनी कारने घेतला पेट; कुटुंबीय थोडक्यात बचावले

नाशिक: बर्निंग कारचा थरार, चालत्या ओमनी कारने घेतला पेट; कुटुंबीय थोडक्यात बचावले

नाशिक (प्रतिनिधी): वाहने पेट घेण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. असाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे..

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पिंपळगांव ला जोडणाऱ्या शिवनदी पुलावर ओमनी कारला आग लागल्याची घटना घडली आहे.

बुधवारी (दि. ७ डिसेंबर) दुपारी 12 वाजता पुलावरून जात असताना ओमनी कारला अचानक आग लागली.

या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कार मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुनील कैलास पगारे हे ब्राम्हणगाव येथे राहतात. त्यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. गावातच ते भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी पगारे हे त्यांची ओमनी कार क्रमांक MH 15 BX 0658 या गाडीने कुटुंबियांसोबत देवदर्शनाला निघाले होते. मात्र लासलगाव आणि पिंपळगाव शहराला जोडणाऱ्या शिवनदी वर गाडी आल्यानंतर कारने अचानक पेट घेतला. कारने पेट घेतल्याचे कुटुंबियांच्या लक्षात येताच चालकाने व कुटुंबातील इतर सदस्यांनी कारच्या बाहेर उडी घेऊन आपले प्राण वाचविले. परिसरातील नागरिकांनी कारला आग लागल्याचे समजताच मिळेल तिथून पाण्याच्या बादल्या आणून सदर आग विझवण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अखेर अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी आल्या नंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790