नाशिक: बनावट बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न; पालकमंत्री भुसेंनी पकडला चोर

नाशिक: बनावट बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न; पालकमंत्री भुसेंनी पकडला चोर

नाशिक (प्रतिनिधी): मालेगाव येथील कलेक्टरपट्टा भागातील जैन स्थानकाजवळील मितेश विनोद दोशी (वय ५५) यांच्या बंगल्यात घुसून ४० वर्षीय दरोडेखोराने नकली पिस्तुलचा धाक दाखवत सोने व पैसे लुटण्याचा प्रयत्न केला.

लक्ष्मीपुजनाचा सण असल्याने घरात फक्त तीन महिलाच होत्या. त्याने महिलांच्या हातावर चावा घेत डोक्यावर मारले.

या घटनेचे वृत्त शहरात पसरताच बंगल्याभोवती मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पालकमंत्री दादा भुसे तातडीने घटनास्थळी पोहोचले.

महिलांना वेठीस धरणाऱ्या भामट्याला आत्मसमर्पण करण्यास सांगत त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. घरातील महिलांच्या समय सुचकतेने मोठा अनर्थ टळला.

शहरातील महावीर ऑटो स्पेअरपार्टसचे व्यावसायिक मितेश दोशी जैन स्थानकाजवळ राहतात. सोमवारी (ता. २४) दुपारी एकच्या सुमारास संशयित कृष्णा अण्णा पवार (वय ४०, रा. विद्यानगर, जोगेश्‍वरी कॉलनी, सोयगाव, मालेगाव) हा भामटा चोरीच्या इराद्याने त्यांच्या घरात शिरला. दोशी यांच्या पत्नी भावना, मुली हिमांशी व खुशबू अशा तिघीच घरात होत्या.  भामट्याने नकली पिस्तुलाचा धाक दाखवत महिलांना घाबरविले. हिमांशी यांच्या हाताला चावा घेतला. तर भावना यांच्या डोक्यावर मारहाण केली. या प्रकारानंतर महिलांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक धावून आले.

टेरेसवरून चोरटा खाली येत नसल्याने अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार यांच्यासह जवानांना पाचारण करण्यात आले होते. बंगल्याच्या बाहेर संतप्त जमाव जमल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत दादा भुसे यांनी शेजारच्या बंगल्याच्या टेरेसवर जाऊन ‘तुला कुणी मारणार नाही, पोलिसांच्या स्वाधीन होऊन जा, असे सांगितल्याने चोरटा खाली आला. त्यास मालेगाव पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे खेळण्याचे पिस्तुल सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला. या प्रकारामुळे शहर व परिसरात खळबळ उडाली होती. छावणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790