नाशिक: ‘या’ पोलीस चौकीतच रंगली ओली पार्टी; तक्रार देण्यासाठी गेलेल्या दोघा भावांना मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात पोलीस चौकीतच चक्क दारूची पार्टी रंगली होती.
यावेळी परिसरातील नागरिक एक तक्रार देण्यासाठी चौकीत गेले आणि हा प्रकार उघडकीस आला.
हा प्रकार इथेच थांबला नाही, तर तक्रार करण्यास गेलेल्या दोघांना मारहाण झाल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेवनगर परिसरातील पोलिस चौकीतच ५ कर्माचाऱ्यांनी मद्यप्राशन केले.
नागरिक तेथील महापालिकेच्या बागेत काही प्रेमी युगुलांचे चाळे सुरू असल्याची तक्रार देण्यासाठी गेले असताना त्यांना या पार्टीत रंगलेल्या पोलिसांनी त्यातील दोघांना मारहाण केली. रात्री सव्वादहा वाजता घडलेल्या या घटनेनंतर रात्री उशीरायर्पंत या भागात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव तर शांत झाला. परंतु रात्री उशीरापर्यंत ही चौकी हद्दीत असलेल्या गंगापूर रोड पोलिस ठाण्यासमोर जमाव जमलेला होता.
या परिसरातील शांतीनिकेतन लेन नं २ च्या शेवटच्या बंगल्यातलगत महापालिकेचे गार्डन आहे. तेथे रोज बाहेरून बाहेरचे टवाळखोर तरुण जमून मद्यप्राशन करून धिंगाणा घालतात. प्रेमी युगुलही रात्री चाळे करतात. त्याची तक्रार देण्यासाठी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे हे बंधू बापू शिंदेंसह रात्री १० वाजता दादोजी कोंडदेव नगर पोलिस चौकीत गेले.
तेव्हा तेथे ५ ते ६ पोलिस दरवाजा आतून लाऊन पार्टीत मग्न होते. शिंदे यांनी चौकीचे दार वाजविले असता मद्यधुंद पोलिसांनी दार उघडले आणि शिंदे यांना शिविगाळ केली. चौकीतील दिवे बंद करून त्यांना मारहाण केली. शिंदे बंधूंची आरडाओरड ऐकून रहिवाशांचा मोठा जमाव तेथे जमला. हे पाहून मद्यपी पोलिसांनी पळ काढला.
या प्रकारची माहिती कळताच पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व नंतर गंगापूर रोड ठाण्याकडे धाव घेतली. त्यांच्या वाहनांचा राबता सुरू झाल्याने अचानक काय घडले, ही चर्चाच परिसरात सुरु झाली होती.
याप्रकरणी सिंग नामक कर्मचाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. बाकीचे फरार झाले. त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी झाली नाही, तर त्यांच्या पार्टीचा पुरावाच नष्ट होण्याचे आव्हान त्यांच्याच विभागातील पोलिस कर्मचाऱ्यांसमोर होते. स्थानिक रहिवाशांनी घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे वातावरण आणखीनच तापले. उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना, गंगापूर रोड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाझ शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व संबंधित दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्याने तणाव कमी झाला. आता आज याप्रकरणी पोलिस आयुक्त दीपक पांडेय काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.