नाशिक: पतीचे फेसबुक अकाउंट हॅक करून बदनामी करत पत्नीनेच मागितली ४५ लाखांची खंडणी
नाशिक (प्रतिनिधी): पत्नीने पतीचे फेसबुक अकाऊन्ट हॅक करत बदनामीची धमकी देत पतीला ब्लॅकमेल केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
पत्नीनेच दोघांच्या मदतीने मोबाइलचा सर्व डाटा व सोशल मीडिया अकाउंट हॅक करत सोशल मीडियावर बदनामी करत हे प्रकरण मिटवण्यासाठी ४५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशान्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबुक हॅक करून व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे, तसेच सोशल मीडियावरून अश्लील मेसेज पाठवून धमकावण्यासह ४५ लाख रुपये न दिल्यास त्याच्या कार्यालयात पर्सनल मेसेज शेअर करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद इरशेट्टी (रा. लक्ष्मीनगर, राणाप्रताप चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित माधुरी ऊर्फ ज्योती विनोद इरशेट्टी (२९), रमेश सोनवणे (५६, रा. पोरबंदर, गुजरात) व एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांची पत्नी माधुरी ऊर्फ ज्योती यांच्यात कौटुंबिक कलह आहे. दरम्यान, संशयितांनी विनोद यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यांच्या मित्र-नातलगांना बदनामीकारक मेसेज पाठविले. तसेच, रमेश सोनवणे यांनी फिर्यादीकडे ४५ लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पैसे न दिल्यास पर्सनल मेसेज ऑफिसमध्ये शेअर करण्याची धमकी दिली. इरशेट्टी यांनी याबाबत न्यायालयात दावा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक नयन बगाडे हे तपास करीत आहेत.