नाशिक: दुचाकी आणि इंडिकाच्या धडकेत युवक गंभीर जखमी.. घटना सीसीटीव्हीत कैद (VIDEO)
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील सातपूर येथे सोमवारी रात्री (14 मार्च) एका तीस वर्षीय युवकाचा अपघात झाला आहे.
मोटार सायकल आणि इंडिका गाडीचा समोरासमोर अपघात झाला असून अपघाताचे दृश्य सीसीटिव्हीत कैद झाले आहे.
या तरुणाचे नाव गंधर्व नंदा शाहू असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गंधर्व शाहु आणि त्याचा भाऊ कुमार शाहू हे नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत कंपनीमध्ये कामाला आहेत.
दोघेही भाऊ ओडिशा येथील रहिवासी आहेत. गंधर्व नाशिक मध्ये सातपूर येथील शिवाजी नगर, धर्माजी कॉलनी गणपती मंदिर जवळ वास्तव्यास आहेत. त्याच्या सोबत त्यांची पत्नी आणि 8 वर्षांचा एक लहान मुलगा रहात आहेत. एक महिन्यापूर्वी गंधर्व याने पत्नी आणि मुलाला गावाकडे पाठवले आहे.
गंधर्व हे दिवसा कंपनीतील काम संपवून घरी आले होते. घरात काही सामान आणण्यासाठी ते रात्री 9 वाजेच्या सुमारास घराबाहेर निघाले होते. स्वतःच्या मोटार सायकलने ते श्रमिक नगर कडून शिवाजी नगर कडे जात असताना बागलाण चिकन सेंटर समोर असलेल्या वळणावर अचानक इंडिका गाडी समोर आली.
अपघात होऊ नये म्हणून गंधर्वने बाजूला टर्न करण्याचा प्रयन्त केला, मात्र वेग जास्त असल्याने मोटार सायकल इंडिका वर आदळली आणि गंधर्व गाडी वरून लांब फेकला गेला. यात गंधर्व यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेबाबत सातपूर पोलीस ठाण्यात तक्रात करण्यात आली असून अपघायचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.