नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या सिडको परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे आहे. अंगावर कपाट पडल्याने तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. शौर्य सुजित विश्वकर्मा असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. जाधव संकुलमध्ये बुधवारी (26 एप्रिल) ही हृदय हेलावणारी दुर्दैवी घटना घडली.
शौर्य आणि त्याचे कुटुंबीय झोपेत असताना सकाळी सुमारे साडेसहा वाजता अवघा तीन वर्षाच्या शौर्य सुजित विश्वकर्मा याच्या अंगावर लाकडी कपाट पडल्याने त्याचा जागीच करूण अंत झाला. सदर बाब परिसरात समजतात एकच शोककळा पसरली. मुलाच्या पालकांवर आभाळच कोसळलं.
आपला पोटचा मुलगा जिवंत असेल अशी भावना घेऊन त्यांनी जिल्हा रुग्णालयात त्यास उपचारासाठी दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शौर्य यास तपासून मृत घोषित करताच त्याच्या पालकांनी एकच हंबरडा फोडला. अंबड परिसरातील जाधव संकुल येथे राहणाऱ्या विश्वकर्मा परिवारावर या प्रसंगामुळे मोठी शोककळा पसरली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.