नाशिक: गाड्या फोडत दहशत पसरविण्याचा प्रयत्न; अर्ध्या तासात संशयित ताब्यात
नाशिक (प्रतिनिधी): उत्तमनगरच्या शुभम पार्क परिसरामध्ये मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवत असताना काही गाड्यांसह नगरसेविकाच्या दुकानाच्या बाहेर असलेल्या गाड्यांची तोडफोड करत टवाळखोरांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात सापळा रचून संशयिताना अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. ९)सायंकाळी काही टवाळखोरांमध्येमध्ये आपसात झालेल्या भांडणाचे रुपांतर दहशतीत झाले.
त्यांनी हातात कोयते घेऊन ८ ते ९ गाड्यांच्या काचा फोडल्या तसेच भाजप नगरसेविका छाया देवांग यांच्या दुकानाबाहेर असलेल्या हातगाडीवर देखील त्यांनी हल्ला केला. मात्र हे करत असताना अंबड पोलीस ठाण्याला निनावी फोन आला. यातूनच पोलिसांनी घटनास्थळी येत चौकशी केली असता टवाळखोर हे पळून गेले होते.
- महत्वाची बातमी: नाशिक शहरात शुक्रवारी (दि. ११ फेब्रुवारी) ‘या’ भागात पाणीपुरवठा नाही
- नाशिक: ‘प्रपोज डे’वरून राडा; विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी
मात्र पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमातून सूत्र लावून वैभव रणजीत लोखंडे (१९, रा. रिगल अष्टविनायक बिल्डिंग, अंबड), वैभव गजानन किरकाडे (२८ ,रा. उमराळे बुद्रुक नाशिक, सध्या रा. मेहरधाम पंचवटी), अविनाश शिवाजी गायकवाड (३२, शुभम पार्क, अंबड ) यांना त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी कोयत्यासह अवघ्या अर्ध्या तासाच्या आत पोलिसांनी ताब्यात घेतले. ही मोहीम वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे गणेश शिंदे, अंमलदार प्रशांत नागरे, किरण गायकवाड, नितीन सानप, हेमंत आहेर, मच्छिंद्र वाकचौरे, जनार्दन ढाकणे, प्रमोद काशीद, योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे, तुळशीराम जाधव यांनी यशस्वीरित्या राबविली.