नाशिक: गर्दी नियमांचे उल्लंघन केल्यास लॉन्स, मंगल कार्यालय सील करणार
नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर रोड भागात दहा वर्षीय बालकाला कोरोनाच्या ओमिक्रोन या व्हेरीयंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शहरात पुन्हा एकदा फिजिकल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.
त्याचाच एक भाग म्हणून, गर्दी नियमांचे उल्लंघन करणारी हॉटेल्स, मंगल कार्यालये सील करण्याचे आदेश पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असताना राज्यभरात रुग्ण संख्या वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा अतिदक्षता घेतली जात आहे.
त्यात नाशिकमध्ये गुरूवारी(दि. ३०) ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे गर्दीवर निर्बंध आणण्यासाठी राज्य शासनाने सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्याला केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी खातेप्रमुखांची बैठक घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
प्रामुख्याने गेल्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लग्नसराईनंतर कोरोनाची दुसरी लाट आली होती. आताही लग्नसोहळे वा अन्य समारंभास मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमत असून याठिकाणी मास्कही लावले जात नसल्यामुळे आयुक्त जाधव यांनी अशा ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.