खबरदार! वादग्रस्त पोस्ट कराल तर? आक्षेपार्ह पोस्ट तपासणीसाठी नाशिक पोलिसांच नवं ‘सॉफ्टवेअर’

नाशिक (प्रतिनिधी): दोन समाजात तेढ वाढविण्यासाठी समाजकंटकांकडून सोशल मीडियाचा सर्रास वापर सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता नाशिक शहर सायबर पोलिसांनी सायबर गस्त वाढवून एका विशिष्ट ‘सॉफ्टवेअर’चा वापर सुरू केला आहे. त्याद्वारे आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर अपलोड करणाऱ्या व्यक्तीची माहिती त्वरित सायबर पोलिसांना मिळते आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वातावरण वादग्रस्त पोस्टमुळे ढवळून निघाले आहे. सद्यस्थितीत हे वातावरण शांत असून मात्र तरीदेखील गृह विभागाकडून सोशल मीडियावर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गृहविभागाने सर्व पोलीस दलांना सतर्कतेचे आदेश दिल्याने पोलिसांनी ही कार्यवाही सुरू करून सोशल मीडियावरील काही खात्यांबाबत कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपासून सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट राज्यात अपलोड होत आहेत. त्यावरून कोल्हापूरसह नगर आणि अन्य जिल्ह्यांत तणाव निर्माण झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

तर दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या घोटी पोलिसांत एका तरुणावर त्यामुळे गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर नाशिक आयुक्तालयाने सोशल मीडिया वापरकर्त्यांना सतर्क राहण्यासह आक्षेपार्ह मजकूर अपलोड न करण्याचे सूचित केले आहे.

नाशिकमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था कायम असून, सायबर गस्तीनुसार सर्वांच्या प्रोफाइल्सवरील पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच एका विशिष्ट सॉफ्टवेअरची खरेदी नाशिक पोलिसांनी केली आहे. आक्षेपार्ह मेसेज व पोस्ट टाकल्यास त्वरित त्याची माहिती पोलिसांना मिळत आहे. यासह आयुक्तालयाने परिसरात करडी नजर ठेवण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून वृद्धाची पाच लाख रुपयांची फसवणूक

दरम्यान संमिश्र वस्ती, संवेदनशील ठिकाणी गोपनीय यंत्रणा सतर्क केली आहे. आयुक्तालयातील विशेष शाखेसह पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखा विशेष खबरदारी घेत आहे. यासह स्थानिक गुन्हे शोधपथकांसह गुन्हे 1 व 2 तसेच मध्यवर्ती गुन्हे, अमली पदार्थविरोधी, खंडणीविरोधी, दरोडाविरोधी, गुंडाविरोधी पथकांनी कामकाज सुरू केले आहे. मुख्यालयातील राखीव पथके सतर्क आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी ‘महाकुंभ’ची निर्मिती करा- मुख्यमंत्री फडणवीस

‘ते’ वादग्रस्त ट्विटर अकाऊंट लॉक:
काही दिवसांपूर्वी ट्विटर अकाउंट वर वादग्रस्त पोस्ट करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी तातडीने संबंधित अकाउंटवर कारवाई करण्यासाठी ट्विटरला विनंती केली होती. त्यानुसार हे खाते कतारमधील असल्याचे समोर आले. या ट्विटर हँडलवर महाराष्ट्रातील महापुरुषाविषयी आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्याने सायबर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. संबंधित पोस्टला रिप्लाय करीत कारवाईचा इशारा दिला. यासह ट्विटरलाही यासंदर्भात नोटीस पाठवून अशा प्रकारचा वादग्रस्त मजकूर त्वरित हटविण्याची सूचना केली होती, त्यानुसार शनिवारी दुपारनंतर संबंधित ट्विटर हँडल ‘लॉक’ झाले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790