नाशिक (प्रतिनिधी): कोरोना संसर्गाला घरच्या घरी अटकाव करण्यासाठी कोरोना सेल्फ किटचा सर्रास वापर होत आहे.
मात्र त्यातून घरच्या घरी उपचार करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या बाहेर पडत नाही.
यामुळे अखेरीस महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मेडीकल स्टोअर्समधून होत असलेल्या किट विक्रीला पायबंद घातला असल्याचे वृत्त आहे.
आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाशिवाय किट विक्री करू नये, तशा सूचना द्याव्यात असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिले.
शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रमाणेच तिसरी लाट भयानक दिसून येत आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्ह रेट ४१ टक्के असल्याने रुग्ण संख्या दहा हजारांपर्यंत पोचली आहे. परंतु, तिसऱ्या लाटेत नागरिकांमध्ये भितीचे प्रमाण कमी दिसून येत आहे.
त्यात मेडीकल दुकानांमध्ये सहजपणे कोरोना सेल्फ किट उपलब्ध होत असल्याने त्या किटच्या माध्यमातून टेस्ट करून पॉझिटिव्ह आढळून आल्यास घरच्या घरी उपचार केला जात आहे. परंतु, यातून किती रुग्ण बाधित झाले याची आकडेवारी सरकारी दप्तरात सापडत नाही. सेल्फ किट घेतल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक आहे, परंतु ती पध्दत अवलंबिली जात नाही. त्यामुळे कोरोना बाधितांचा तिसऱ्या लाटेतील खरा आकडा समोर येत नाही.
शहरात दररोज जवळपास पाचशे किट विकल्या जात असल्याचा संशय आहे, परंतु त्याप्रमाणात नोंद होत नाही. त्यामुळे वैद्यकीय विभागाने अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना पत्र लिहून किट विक्रीचा डेटा देण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर किट विक्री करताना आधार क्रमांक व संबंधितांचा मोबाईल क्रमांक बंधनकारक केला आहे.
थेट गाठणार घर:
कोरोनाची भीती कमी झाली तरी सामाजिक बहिष्काराची भीती मात्र कमी झाली नाही. त्यामुळे किट खरेदी केल्यानंतर संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याबाबत माहिती समोर येत नसल्याने आता मेडीकल स्टोअर्सना माहिती संकलित करणे बंधनकारक केले जाणार आहे. संबंधिताने माहिती न कळविल्यास वैद्यकीय विभागाचे कर्मचारी थेट घर गाठणार आहे.