नाशिक: कोरोनामुळे पालक गमावलेल्या 24 बालकांना इतक्या लाखांची आर्थिक मदत मंजूर !

कोरोनामुळे पालक गमावलेल्या 24 बालकांना इतक्या लाखांची आर्थिक मदत मंजूर !

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ज्या बालकांच्या दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा 0 ते 18 वर्षापर्यंतच्या 24 बालकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे सहाय्य मुदत ठेवीच्या स्वरूपात आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बालकांची काळजी व संरक्षण कृतीदलाच्या आढावा बैठकीत मंजूर करण्यात आले.  बालकांच्या संगोपनासाठी बालसंगोपन निधीच्या माध्यमातून तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, विधी व सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश प्रसाद कुलकर्णी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. आर. श्रीवास, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा शुभांगी बेळगांवकर, जिल्हा बाल संरक्षण समितीचे समन्वयक गणेश कानवडे, परिविक्षा अधिकारी योगीराज जाधव यांच्यासह नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, कोरोना काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण करतांना ज्या बालकांचा सांभाळ त्यांचे नातेवाईक करत असतील त्यांच्या एकूण आर्थिक परिस्थितीचा देखील विचार करण्यात यावा. याअंतर्गत अनाथ झालेल्या बालकांचा सांभाळ करणाऱ्या ज्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल, अशा बालकांना स्वयंसेवी संस्थांच्या बालकाश्रमात ठेवण्यासाठी नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात यावे, जेणे करून संबंधित बालकांचा सर्वांगिण विकास होऊन त्यांचे पालन व्यवस्थितरित्या होण्यासाठी मदत होईल. तसेच जे नातेवाईक अथवा कुटूंबातील सदस्य बालकांचे संगोपन करण्यासाठी इच्छुक नाहीत अशा बालकांना देखील बालगृहात दाखल करण्यासाठी योग्यती कार्यवाही करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले.

कोरोना प्रादुर्भावामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावल्याने जी बालके अनाथ झाली आहेत, अशा बालकांच्या पुनर्वसन व सर्वांगिण विकासासाठी संबंधित बालक व जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी यांच्या नावे सामायिक बँक खात्यावर एकरकमी पाच लाख रूपये मुदत ठेवीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याने जिल्हा माहिला व बाल विकास यंत्रणेने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक सर्व कार्यवाही करावी. याकरीता आरोग्य यंत्रणेचे सहकार्य घेण्यात यावे. त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनांचा लाभ या बालकांना होण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. प्रशासनाकडून अशा सर्व बालकांचा शोध जरी घेतला जाणार असला तरी नागरिकांना देखील याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेली एकूण 861 बालके असून त्यापैकी शून्य ते 18 वयोगटातील 24 बालकांनी आपली दोन्ही पालक गमावली असून याच वयोगटातील 778 बालकांनी एक पालक गमावले आहे. त्याचप्रमाणे 19 ते 23 वर्षे वयोगटातील 9 बालकांनी दोन्ही पालक तर याच वयोगटातील 50 बालकांनी आपले एक पालक गमावले आहेत. यातील 396 बालकांना बाल संगोपन योजनांचा लाभ मंजुर करण्यात आला असून वारस नोंदणी व शिधापत्रिकांच्या लाभासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी बैठकीत सादर केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790