नाशिक (प्रतिनिधी): आरटीओमध्ये बदली प्रकरणात सुमारे ३०० कोटींचा अपहार झाल्याची तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणताही गुन्हा झाल्याचे निष्पन्न होत नसल्याचे पुढे आले. या तक्रार अर्जामुळे राज्यात खळबळ उडली होती. यामध्ये थेट परिवहनमंत्री अनिल परब, मंत्रालयाचे सचिव या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अपहाराचे आरोप करण्यात आले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्य पद्धतीमधील अनियमितता आर्थिक गैरव्यवहाराबाबत विभागांतर्गत वाद, बदली प्रकरणात कथित अनागोंदी कारभार आणि बदलीसाठी अपहार झाल्याची तक्रार १५ मे रोजी पंचवटी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. या अर्जाची दखल घेत पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी उपायुक्त संजय बारकुंड यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
तक्रार अर्जानुसार, परिवहन खात्याचे आयुक्त अविनाश ढाकणे, उपपरिवहन आयुक्त जितेंद्र कदम, उपसचिव प्रकाश साबळे, अवर सचिव डी. एच. कदम, वर्धा प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यासह नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यासह खासगी व्यक्ती, एजंट अशा २५ ते ३० अधिकारी, कर्मचारी आणि इतरांची चौकशी केली. तक्रारदार निलंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवाल पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांना पाठवला. त्यानुसार आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हा झाल्याचे चौकशीत निष्पन्न होत नाही. अर्जातील इतर तथ्यांविषयी मुद्देसूद अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पोलिस महासंचालक कार्यालयात सादर करण्यात आला आहे.
तक्रारदारच चौकशीच्या फेऱ्यात:
चौकशीमध्ये तक्रारदारावर पोलिसांनी संशय व्यक्त केला असून तक्रारदाराची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.