नाशिक: अवैध विदेशी मद्यासह हॉटेल मालकाला अटक; फियाट कारसह मद्यसाठा जप्त
नाशिक (प्रतिनिधी): अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या हॉटेल चालकास शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडून १५ हजारांचे विदेशी मद्य व पाच लाखांची फियाट कार जप्त केली असून, याप्रकरणी सातपूर पोलिसात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहित मुकेश छंगानी (२५, रा. शुभम हाईट्स, मेट्रोझोन पाठीमागे, पाथर्डी फाटा) असे संशयित हॉटेलचालकाचे नाव आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे हवालदार राजेंद्र घुमरे यांना अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याबाबत खबर मिळाली होती.
सदरील माहिती वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांना दिली असता, त्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक उपनिरीक्षक राजाराम वाघ, हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, गुलाब सोनार यांनी सातपूरमधील अशोकनगर येथील नागरगोजे कॉम्प्लेक्ससमोर सोमवारी (ता. १०) दुपारी दीडच्या सुमारास सापळा रचून छंगानीला फियाट कारसह ताब्यात घेतले.
१४ हजार ९७३ रुपयांची विविध विदेशी ब्रान्डच्या मद्याची वाहतूक ५ लाख रुपयांची सिल्वर रंगाची फियाट (एमएच १५ इपी ६८०१) कारमधून केली जात होती. विदेशी मद्य बाळगण्याचा परवाना नसताना त्याची वाहतूक करुन विक्री करण्याच्या उद्देशाने जात असल्याने छंगानीविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.