नाशिकला हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येणार का ?

नाशिक(प्रतिनिधी): शहरात कोरोनाने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये  रूग्णसंख्येत उच्चांक गाठला होता. मात्र,कोरोनाचा प्रादुर्भाव हा ऑक्टोबर महिन्यामध्ये कमी झाला असल्याचे दिसून येते. मात्र हिवाळ्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटले आहे.  कैलास जाधव यांनी गुरुवारी( दि.८ ऑक्टोबर) रोजी झूम मीटिंगच्या सहाय्याने सर्व माध्यमांच्या संपादकांशी संवाद साधला.

त्याप्रसंगी जाधव यांनी शहरातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे सांगितले. तर दुसर्‍या बाजूला हिवाळ्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत देखील जाधव यांनी दिले आहेत. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असले, तरी नाशिककरांनी सावधगिरी बाळगावी व शासनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वेक्षण मोहीम अधिक व्यापक आणि तीव्रतेने राबवणार असल्याचेही जाधव म्हणाले.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या मध्यंतरी ६ हजारांच्या पार गेली होती. परंतु, प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे व योग्य नियोजनामुळे आता ती ४ हजारांच्या खाली आली आहे. मात्र, हिवाळ्यात ही संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता असून ६ ते १० हजारांच्या दरम्यान जाऊ शकते. त्यामुळे आतापासूनच सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. तर अमरधाम येथे दुसरी विद्युतदाहिनी बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम अधिक जोरात राबवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न देखील कमी झाले आहे. परंतु, पाणी,स्वच्छता,आरोग्य यांना महत्त्व देऊन प्राधान्य देत निधी खर्च केला जात आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी विकास शुल्कात घट झाली असली तरी, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सक्तीने करवसुली केली जाणार नाही असेही जाधव‌ यांनी स्पष्टी केले. तसेच गोदावरी सुशोभीकरणाचा देखील विचार करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. तर दुसर्‍या बाजूला नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात अधिक सोयसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील व गोरगरिबांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे बिटको रुग्णालयाचे खाजगीकरण अजिबात होणार नाही. असे आयुक्तांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790