नाशिकमधील वाढत्या विमानसेवेने पर्यटन विकासाला मिळणार चालना- पालकमंत्री भुजबळ

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक विमानतळावरुन हैद्राबाद, पुणे, अहमदाबाद, नाशिक अहमदाबाद,नवी दिल्ली,हैद्राबाद, बंगरुळ याबरोबरच आजपासून नाशिक बेळगांव विमान सेवा सुरु झाली आहे. नाशिकमधील वाढत्या विमानसेवेने उद्योग व पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ओझर विमानतळ येथे स्टार एअर कंपनीच्या नाशिक बेळगांव विमान सेवेचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ.भारती पवार, एच ए एल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.शेषगिरीराव, सामान्य व्यवस्थापक ए.बी.प्रधान, दिपक सिंघल, दिंडोरी प्रांत अधिकारी संदीप आहेर,  स्टार एअर कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक सी.ए.बोपन्ना, उद्योजक मनिष रावल उपस्थित होते.

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक बेळगांव विमान सुरु होणे हे जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. कारण या विमानसेवेमुळे गाडीपेक्षाही कमी खर्चात व कमी वेळेत प्रवाशांना बेळगांवला जाणे सोयीस्कर व आरामदायी होणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल मराठी साहित्य संमेलनास देशभरातून येणाऱ्या साहित्यिकांना देखील या विमानसेवेचा लाभ होणार असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक विमानतळ हे राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कमी पैशात उत्कृष्ट असे तयार केलेले देशातील एकमेव विमानतळ आहे. तसेच येणाऱ्या काळात या विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिकमधील विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

नाशिक विमानतळावरुन हैद्राबाद, पुणे, अहमदाबाद, नाशिक अहमदाबाद,नवी दिल्ली,हैद्राबाद, बंगरुळ तसेच आजपासून सुरु झालेल्या बेळगांव विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे येत्या काळात पर्यटन व उद्योगवाढीला चालना देण्यासाठी तसेच नाशिकमध्ये राहणाऱ्या विविध प्रातांच्या लोकांसाठी अजून विमानसेवा वाढल्या पाहिजेत असा अशावाद, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री यांचे हस्ते यावेळी स्टार एअर कार्यालयाचे, चेक इन कॉऊंटरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बोर्डींग पासचे अनावरण पालकमंत्र्याच्या हस्ते राधाकृष्ण झडप व सुमन झडप या दाम्पत्यांला देवून करण्यात आले.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790