४० वर्षावरील स्त्रियांमध्ये प्रारंभिक अवस्थेत असलेल्या स्तनाच्या कर्क रोगाचे निदान करू शकणारी ही पहिलीच रक्त तपासणी आहे.
नाशिक (प्रतिनिधी): दातार कॅन्सर जेनेटिक्स या आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्करोगावर संशोधन करण्यात अग्रगण्य असलेल्या कंपनीने स्तन-कर्करोगाचे प्रारंभिक अवस्थेत निदान करणाऱ्या त्यांच्या रक्त-तपासणीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचे (युएसएफडीए) ‘महत्वपूर्ण प्रगती’ (ब्रेकथ्रू डेसिग्नेशन) असे अभिनाम प्राप्त झाल्याची आज घोषणा केली.
कंपनीने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत: विकसित केलेल्या या रक्त तपासणीमध्ये स्तनाचा कर्करोग असणाऱ्या स्त्रियांच्या रक्तात आढळणाऱ्या विशिष्ट ट्युमर पेशी व पेशीसमूह अत्यंत अचूकपणे शोधले जातात. प्रारंभिक अवस्थेमधील (स्टेज झिरो किंवा वन) स्तनाचा कर्करोग ९९% पेक्षा जास्त अचूकतेने शोधता येतो, त्यात चुकून पॉझिटीव्ह येण्याची शक्यता नगण्य आहे, असे वैद्यकीय चाचण्यातील डेटाद्वारे सिद्ध करण्यात आले आहे. वीस हजारपेक्षा जास्त स्तन-कर्करोगग्रस्त स्त्रिया आणि निरोगी स्त्रिया याच्या अभ्यासातून या तपासणीचे प्रमाणीकरण झाले आहे. तपासणीसाठी फक्त ५ मिली रक्त नमुन्याची गरज असून मामोग्राफीमध्ये होणारा रेडीएशनचा त्रास टळतो.
भारतामध्ये एका वर्षात साधारण १.७ लाखापेक्षा जास्त महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान होते आणि ते सुद्धा बहुसंख्य वेळा कर्करोग स्टेज ३ किंवा ४ मध्ये पोचलेला असतो. त्यामुळे उपाय योजनांचा त्रास आणि खर्च मोठ्या प्रमाणात होतो व उपाययोजना यशस्वी होण्याची शक्यताही कमी असते. लवकर व वेळीच निदान झाल्यास ९० टक्क्यापेक्षा जास्त महिला कर्करोग मुक्त होऊ शकतात.
“कर्करोगाची कोणतीही लक्षणे नसणाऱ्या चाळीस वर्षा वरील महिलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने तसेच आपल्या सोयीने घरून किंवा ऑफिस मधून सहजपणे करता येईल अशी रक्त तपासणी पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहे. या तपासणीला ‘ब्रेकथ्रू डेसिग्नेशन’ असे अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचेअभिनाम प्राप्त होणे हा कंपनीसाठी अत्यंत लक्षणीय आणि महत्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे अतिशय लवकर निदान होऊन जगभरातील बहुसंख्य महिला स्तनाच्या कर्क रोगापासून मुक्त होऊ शकतील अशी क्षमता या चाचणीत आहे ही बाब अधोरेखित झाली आहे.तसेच भारतातील शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय चिकित्सकांनी अथक परिश्रमांनी आपल्या देशाला जगभरातील कर्क रोग संशोधनाच्या मंचावर नेऊन ठेवले आहे याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो, तसेच माननीय पंतप्रधानाच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियानाचे’ हे एक उदाहरण म्हणता येईल” असे दातार कॅन्सर जेनेटिक्सचे चेअरमन राजन दातार यांनी सांगितले.
सीईमानांकन मिळालेली ही तपासणी युरोपमध्ये ‘ट्रूचेक ब्रेस्ट’ या नावाने काही दिवसांपासून उपलब्ध झाली आहे. तसेच लवकरच भारतातही ‘इझीचेक ब्रेस्ट’ या नावाने वाजवी दरात उपलब्ध होत आहे. सर्वसामान्यांना टी तपासणी सहज उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्यक्षेत्रातील मानांकित संस्थाबरोबर चर्चा सुरु आहे.
फुफ्फुस, स्वादुपिंड, अंडाशय यासारख्या अनेक अत्यंत प्राणघातक कर्करोगांचे अशाच प्रकारे लवकर निदान करता यावे म्हणून कंपनी कार्यरत असून पुढील वर्षी टी उपलब्ध होऊल अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे.
दातार कॅन्सर जेनेटिक्स ही कर्करोग संशोधनातील एक अग्रगण्य कंपनी असून नॉनइंव्हेसीव तंत्रज्ञानाचा वापर लवकर अचूक निदान, आणि कर्करोगाच्या उपाय योजनेसाठी करण्यामध्ये त्यांचे खास वैशिष्य आहे. कंपनीचे अत्याधुनिक संशोधन केंद्र NABL, ISO, CAP,CLIA प्रमाणित असून युके, युरोप, अमेरिका, आखाती देश आणि भारतातील पेशंटना सेवा देत आहे.