नाशिककरांनो सावधान: कुलूप तोडून ग्राहकांना परस्पर दिले फ्लॅट; २० लाखांची फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी): निवासी प्रकल्पात सहभागीदार असलेल्या संशयित महिलेने कोरोनाकाळात ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना सदनिका उपलब्ध करून देत ग्राहकांकडून घेण्यात आलेली सुमारे २० लाखांची रक्कम स्वत:कडे ठेवत फसवणूक केल्याची तक्रार कंपनीच्या संचालकाने दिली.
या तक्रारीनुसार संशयित महिला दिव्यानी जैन यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रसन्ना सायखेडकर (रा. त्र्यंबकरोड) यांच्या तक्रारीनुसार, वडील सुभाष सायखेडकर आणि त्यांचे भागीदार विजय ललवाणी यांची जय एंटरप्रायजेस नावाची भागीदार फर्म आहे. कंपनीने मखमलाबादला साई रेसिडेन्सी प्रकल्प साकारला आहे.
येथे २३ सदनिका व २ गाळे आहेत व इतर विजय ललवाणी यांच्या हिश्शाचे आहे. या प्रकल्पाचे फ्लॅट विक्री करण्यासाठी कंपनीकडून संशयित दिव्यानी जैन यांची विक्री प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. नोहेंबर २०२० ते जून २०२१ या काळात कोरोनाचा गैरफायदा घेत १० ते १२ ग्राहकांना विविध प्रकारचे आमिष देत प्लॅट दाखवले. त्यांच्याकडून कोटेशन प्रमाणे अॅडव्हान्स बुकिंगचे घेतलेले पैसे कंपनीमध्ये जमा न करता त्याचा अपहार केला. तसेच फ्लॅट घेतलेल्या ग्राहकांची दिशाभूल करत फ्लॅटचे कुलूप तोडून ताबा दिला. संशयित महिलेने कंपनी आणि ग्राहकांची फसवणूक केली अशा स्वरूपाची तक्रार पंचवटी पोलिस ठाण्यात दिली. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाय. एस. माळी तपास करत आहेत.