त्या दोन इसमांनी मध्यरात्री फोडली परिसरातील अकरा वाहने!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील उपनगर परिसरात रविवारी मध्यरात्री दोन मद्यपी इसमांनी अकरा चारचाकी वाहने फोडल्याची घटना घडली. यामुळे संबंधित परिसरात दहशत निर्माण झाली असून, संशयित आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यातदार जफर तौसिद खान (वय २९, रा. डीजीपीनगर) हे रविवारी (दि.२२) रोजी रात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास आजारी सासरे यांना भेटून उपनगर परिसरातून घरी परत येत होते. त्यावेळी सासरे लतीफ पठाण (रा.इच्छामणी लॉन्समागे, उपनगर) यांच्या घरासमोर दोन इसम आरडाओरड करत भरधाव वेगाने दुचाकीने (एमएच १५, सीआर ५४७४) आले. त्या इसमांनी खान यांची चारचाकी बलेनो (एमएच १५ जीएक्स ०८११) अडवली. दुचाकीस्वार इसमाने दंडुक्याने बलेनोची काच फोडली. दरम्यान, पठाण यांची वॅग्नर कारची (एमएच १५ बीएन ५२३३) काचही फोडली. तसेच या इसमांनी परिसरातील इतर सँट्रो कार, झेन, मारुती व्हॅन, इको स्पोर्ट, बलेनो इत्यादी गाडयांची देखील तोडफोड केली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयित आरोपी सनी नाना शेजवळ व विपुल प्रमोद चंद्रमोरे यांना अटक केली आहे. दोन्ही इसम स्थानिक रहिवासी असून, मागील मारहाणीचा राग मनात धरून त्यांनी हे कृत्य केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790