डेंग्यूने मोडले सुखी संसाराचे स्वप्न! नवविवाहितेच्या मृत्यूने हळहळ

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या २७ ऑगस्टला त्यांनी लग्नगाठ बांधली अन् संसार सुरू झाला. सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवत असतानाच दुर्दैवाने केवळ २१ दिवसांचाच संसार तिच्या नशिबात होता… लग्नाच्या वेळी काढलेल्या मेंदीचा रंगही अद्याप सुकला नव्हता. अशातच लोहोणेर (ता. देवळा) येथे वास्तव्यास असलेल्या नवविवाहितेचा डेंग्यू वर उपचार घेत असतांना मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी-अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी…’ अशी हृ’द’य’द्रा’व’क घटना लोहोणेर येथे गुरुवारी (ता. १६) घडलीये. बागलाण तालुक्यातील मोराणे (सांडस) येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या लोहोणेर येथे वास्तव्यास असलेले आदित्य शेवाळे लोहोणेर येथे संगणकप्रणाली युनिट चालवितात. आदित्य यांचा विवाह गेल्या महिन्यात २७ तारखेला अंबासन येथील शेतकरी नितीन आहिरे यांची कन्या शीतल हिच्याबरोबर उत्साहात झाला. अगदी आनंदाने या नवदांपत्याने आपल्या कौटुंबिक सुखाची स्वप्ने पाहत संसाराला प्रारंभ केला खरा; परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
विवाहानंतर आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगविण्यात दंग असलेल्या नवविवाहित शीतलची सहा दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडली. तिला सटाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे तिच्या प्रकृतीत योग्य ती सुधारणा न झाल्याने दोन दिवसांनी मालेगाव येथे हलविण्यात आले. तेथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर नाशिक येथे दाखल केले. तेथे शीतलवर उपचार सुरू असतानाच गुरुवारी (ता. १६) पहाटे शीतलची प्राणज्योत मालवली.
शोकाकुल वातावरणात तिच्या सासरी मोराणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना जितकी लोहोणेरकरांच्या काळजाला तडा देऊन गेली तितकीच तिच्या माहेरी अंबासन व सासरी मोराणे येथे हृदय हेलावून गेली. विवाहास एकवीस दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच नवविवाहितेवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी घटना घडल्याने दुःखाची तीव्रता मोठी आहे.