नाशिक (प्रतिनिधी): जुने नाशिक परिसरातील नाव दरवाजा येथील योग शिक्षकाच्या जुन्या वाड्यात छताचे पत्रे उचकवून ९ लाखांचा सोने चांदीचे दागिने आणि इतर इलेक्ट्रिकल साहित्य चोरी करणाऱ्या दोघांस अटक करण्यात आली आहे. चोरी केलेले दागिने खरेदी करणाऱ्या तीन सराफांनाही देखील अटक करण्यात आली आहे.
भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. निखिल संजय पवार रा.त्रिकोणी बंगला हिरावाडी, योगेश चंद्रकांत साळी रा. लेखानगर असे संशयित चोरट्यांची नावे आहेत. ९ जून रोजी नाव दरवाजा परिसरात योग शिक्षकाच्या घरी चोरी झाली होती. त्यांचे भाचे मंदार वडगावकर यांच्या तक्रारीनुसार घरातील ९ लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि इलेक्ट्रिकल वस्तू चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पंचवटी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.त्याच्या चौकशीत घरफोडी केल्याचे त्याने सांगितले. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीनुसार चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफ व्यावसायिकाचे नाव निष्पन्न झाले. संशयित राजेंद्र अशोक अहिरराव रा. म्हसरूळ टेक, यशवंत शंकर सोनवणे रा. दिंगरआली, अमोल किसन राजधर रा.दहीपुल यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडून २ लाख १४ हजारांचे सोने चांदीची लगड आणि साहित्य जप्त केले.
वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, दत्ता पवार, ज्ञानेश्वर मोहिते, बी.एम.जाधव, युवराज पाटील, आर. बी. कोळी, एम. एम. शेख, के. एम. सय्यद, सचिन महसदे, एम.एस. सय्यद, एस. पी. निकुंभ जी. एल. साळुंके, एस. एम.पोटींदे यांचेसह पंचवटी पोलिस ठाण्याचे सत्यवान पवार, राजेश राठोड, कुणाल पचलोरे यांच्या पथकाने कारवाई केली.