नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील एक हजार शाळा व साडेतीन हजार अंगणवाडयांना स्वतःच्या पाणीपुरवठ्यांची सोय नाही. ही बाब निदर्शनास आल्याने, जिल्हा परिषदेकडून, येत्या शंभर दिवसांमध्ये या सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाडयांना स्वतःचे नळ कनेक्शन बसवून मिळणार आहे.
आपल्या जीवनात पाण्याला फार महत्व आहे. मात्र, जिल्ह्यात काही प्राथमिक शाळा व अंगणवाडया या अजूनही पाण्याविना असून, मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण होते. त्यामुळे अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांना गावातील सार्वजनिक नळावरून किंव्हा बोअर तसेच विहिरीवरून पाणीपुरवड्याची सोय करावी लागते. तर, फक्त १७२९ अंगणवाड्यांमध्येच स्वतःचे नळ कनेक्शन असून, उर्वरित ५२८५ अंगणवाड्या पाण्याविना आहेत. तर जिल्ह्यात ३४०० हुन अधिक प्राथमिक शाळा असून, त्यातील ९८९ शाळा देखील पाण्याविना आहेत. पाणीटंचाईच्या समस्येला वर्षानुवर्षे शाळा व अंगणवाडयांना तोंड द्यावे लागते. तसेच पाण्याअभावी शाळांमधील स्वच्छतागृहे देखील निकामी पडली आहेत. या सर्व बाबी लक्ष्यात घेऊन, अखेर केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल’ या योजनेच्या अनुषंगाने पाण्याविना असलेल्या सर्व शाळा व अंगणवाडयांना स्वत्रंत नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. या योजनेला २ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून, ९ जानेवारी २०२१ पर्यंत ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे. संबंधित योजनेसंदर्भात शुक्रवारी (दि.४) रोजी ऑनलाईन सर्व गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभाग,शिक्षण व महिला बाल कल्याण विभागाची बैठक घेण्यात आली.