नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तब्बल १४ दारू दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान, विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला विभागाकडून याबाबत कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, कारवाई संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे.
गुरुवारी (दि.१९) रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर टेहरे फाटा येथे एक मालवाहू ट्रक अडवण्यात आला. दरम्यान ट्रकमधून पशुखाद्याच्या गोण्यांच्या पाठीमागे अवैधरित्या मोठा मद्यसाठा नेण्यात येत होता. पोलिसांना झडती दरम्यान ३८ लाख ६६३ रुपये किंमतीच्या मद्यसाठ्याच्या बाटल्यांनी भरलेले खोके आढळले. सदर मद्यसाठा हा संशयित अतुल मदन व्यक्तीचा असल्याची कबुली ट्रक चालकाने पोलिसांना दिली. दरम्यान राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप शहराच्या दौऱ्यावर असल्याने त्यांनी याप्रकरणी अधिक लक्ष्य घातले. त्यानुसार त्यांच्याकडून छापे टाकण्याचे आदेश देण्यात आले.