नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून, जमीन बळकावणार्यांवर तसेच विक्री करणाऱ्या टोळीस मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या सर्व संशयितांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रकाश एकनाथ चौधरी (वय ६० रा.मालेगाव) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी अमृतधाम परिसरात जागा खरेदी केली होती. निवृत्तीनंतर ते मालेगाव येथे रहावयास गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बापू राजाराम सोनवणे (रा.खर्डे, ता.देवळा जि.नाशिक), प्रफुल्ल कैलास आहेर (वय २६, रासबिहारीरोड,पंचवटी), मंगेश रामदास अहिरे (वय ३२, पंचवटी) हे संशयित आरोपी आहेत. या टोळीने चौधरी यांच्या नावाची बनावट व्यक्ती उभी करून, चौधरी यांच्या नावानेच बनावट पॅन कार्ड, मतदान कार्ड, बँक खाते उघडून, चौधरी यांचा प्लॉट परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकला. प्लॉटचा कर भरण्यासाठी चौधरी तलाठी कार्यालयात गेले असता, हा प्रकार लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास करून बापू सोनवणे, प्रफुल्ल आहेर व मंगेश यांना अटक केली आहे.
मात्र, या टोळीतील हिरामण गुंबाडे हा आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या टोळी विरोधात मुंबई नाका, सरकारवाडा, आडगाव व अंबड पोलिस ठाणे येथे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यामुळे जमीन गैरव्यवहाराचे अनेक प्रकार समोर येण्याची दाट शक्यता आहे. नाशिक शहर तसेच नाशिक बाहेर राहणाऱ्या नागरिकांची जमीन व्यवहारात फसवणूक झाली असेल तर त्यांनी मुंबई नाका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.