
चांदोरी पाठोपाठ आता ‘येथेही’ बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई
नाशिक (प्रतिनिधी): निफाड तालुक्यातील चांदोरी येथील एका लॉन्समध्ये बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सायखेड्यातही अशीच एक कारवाई करत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, कारवाई झालेल्या दोन्हीही कारखाने हे वाहतुक सेनेचे पदाधिकारी संजय दाते यांचे असून, ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदोरीतील कारवाईत ताब्यात घेतले आहे.
सायखेडा पोलिस ठाणे हद्दीत चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरीत्या बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याबाबतची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्याप्रमाणे ग्रामीण पोलिस पथकाने चांदोरी शिवारात सोमवारी (ता.११) रात्री अकरा वाजेच्या सुमारास उदयराजे लॉन्सवर अचानक छापा टाकला.
या ठिकाणी वाहतूक सेनेचा निफाड तालुकाध्यक्ष संजय मल्हारी दाते (वय: ४७, रा. गोंदेगाव ता.निफाड जि. नाशिक) यांच्यासह १२ जण मिळून आले. कारवाईत बनावट देशी दारूचे अंदाजे १५०० ते २००० बॉक्स, अंदाजे १०,००० ते १५,००० देशी दारू रिकाम्या बाटल्या, स्पिरीट अंदाजे २० हजार लिटर, २०० लिटरचे ९० ते १०० बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे ५००० ते १०,०००, देशी दारू बनविण्याचे साहित्य, पाण्याच्या ५ टाक्या व ट्रक असा एकूण अंदाजे एक कोटी पाच लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सदर देशी दारू कारखाना अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीच्या उदयराजे लॉन्स मध्ये सुरू असल्याचे चौकशीत दिसून आले. पंचनामा, मुद्देमाल नोंदीनंतर बारा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोच राज्य उत्पादन शुल्क विभागाने सायखेड्यात दुसरा कारखाना उद्धवस्थ करीत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान कारवाई झालेल्या दोन्हीही कारखाने हे वाहतूक सेनेचे पदाधिकारी संजय दाते यांचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान, धुळ्यातील गुन्हेगार उर्फ दिनू डॉन हा बनावट दारू प्रकरणातला मुख्य सूत्रधार असल्याचं पुढे आलंय. त्याच्यावर मोक्का अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई झालेली आहे.
सायखेडा पोलिस ठाणे हद्दीत दोन दिवसापूर्वीच साडेसहा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर चांदोरी व सायखेडा येथे बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा प्रश्न चर्चेत आला आहे.