नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील नागरिकांसाठी खड्डे म्हणजे काही नवीन गोष्ट नाहीच. पावसाळा आला तर रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हेच समजणं अवघड होतं. पावसाळा चालू होऊन मावळतीला आला तरी अजून काही शहरातील रस्ते नीट झालेले बघायला मिळाले नाही. उलट रस्त्यांवर २ ते ३ फुटांवर पडलेले खड्डे तर नक्कीच बघायला मिळतात. पावसाळ्यापूर्वी डागडूजी केलेले रस्ते तर पहिल्याच पावसाच्या पाण्यात वाहून गेले. तरी महापालिका प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
शहराच्या अनेक परिसरातील रस्त्यावर खड्ड्यांनी सम्राज्य प्रस्थापित केले असून खड्डयाच्या रस्त्यावरून गाडी घेऊन जाणे म्हणजे जणू डोक्यावर ओझ घेऊनच डोंगर पार करणे असं वाटू लागलं आहे. वाहनधारकांना ये-जा करतांना जीव मुठीत धरून गाडी चालवत प्रवास करावा लागतोय. रस्त्यांवरील खड्डयांमुळे किरकोळ गंभीर स्वरूपातले अपघात होत आहेत. तसेच पादचाऱ्यांना दुखापत आणि वाहन्धाराकांसोबतच वाहनांचेदेखील नुकसान होत आहे. म्हणून या खड्डेमय रस्त्यांची कामे मार्गी कधी लागणार? असा प्रश्न नागरिकांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.