ऑपरेशन मुस्कान: नाशिकच्या अल्पवयीन मुलींचे अपहरण करून परराज्यात विक्री करणारी टोळी अटकेत

ऑपरेशन मुस्कान: नाशिकच्या अल्पवयीन मुलींचे अपहरण करून परराज्यात विक्री करणारी टोळी अटकेत

नाशिक (प्रतिनिधी): ओझर येथील 14 वर्षीय मुलीस फूस लावून परराज्यातील इसमाशी विवाह लावून देण्याकरिता पावणेदोन लाखांत विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे.

या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

हा प्रकार उघडकीस येताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी, की ओझर येथील 14 वर्षीय मुलीस कोणी तरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दि. 23 जुलै रोजी ओझर पोलिसांकडे दाखल झाली होती.

यासंदर्भात ओझर पोलिसांनी परिसरातील महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता बेपत्ता बालिकेच्या वर्णनाप्रमाणे आढळलेली एक मुलगी एका महिलेसह जात असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवलं.. या अंतर्गत तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी प्रथम प्रियंका देवीदास पाटील (रा. कार्बन नाका, सातपूर, मूळ रा. ओझर, ता. निफाड) या महिलेस ताब्यात घेतले.

तिच्याकडे तपास केला असता या मुलीस तिची मैत्रीण रत्ना कोळी (रा. दहावा मैल, ओझर) हिच्या मदतीने शिरपूर येथील एका महिला व पुरुषास 1 लाख 75 हजार रुपये किमतीस विक्री केल्याचे दिसून आले. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिसांचे एक पथक शिरपूर येथे जाऊन त्यांनी ओझरची रत्ना विक्रम कोळी व शिरपूरची सुरेखा जागो भिला या महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या मुलीची विक्री त्यांनी गुजरातमधील बडोदा येथे केल्याचे समजले.

त्यावरून या पथकाने बडोदा येथे जाऊन तपास केला असता बेपत्ता मुलगी मध्य प्रदेशातील खरगोन येथे असल्याचे समजले. त्यामुळे याच पथकाने खरगोन येथे जाऊन खरगोन येथील संशयित नानूराम येडू मनसारे व गोविंद नानूराम मनसारे (दोघेही रा. लखापूर, ता. भिकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून ओझर येथील पीडित मुलीस सुखरूपपणे ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अन्य आरोपींचा नाशिक ग्रामीण पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस ठाण्याचे पो. नि. अशोक रहाटे, उपनिरीक्षक जी. ए. जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना तोडमल, हवालदार अहिरराव, पोलीस नाईक मोरे, धारबळे, पोलीस कॉन्स्टेबल डंबाळे, बागूल, जाधव व पानसरे यांच्या पथकाने हे रॅकेट उघडकीस आणले असून, पुढील तपास ओझर पोलीस करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group